Source: Sakal Kolhapur
इचलकरंजी : कापडाची मागणी ठप्प असल्यामुळे वस्त्रोद्योगावर अभूतपूर्व मंदिचे सावट निर्माण झाले आहे. कापड उत्पादनात सरासरी ४० टक्के इतकी घट झाल्याची माहिती यंत्रमाग उद्योगातून देण्यात आली. सध्या व्यापारी वर्गाकडून सूत बिमांचा पुरवठा खूपच कमी होत आहे.
त्यामुळे अत्याधुनिक यंत्रमागधारकांना आपले कारखाने आठवड्यातून किमान दोन दिवस बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर कांही कारखान्यात एक पाळी बंद केली आहे. याचा परिणाम, वस्त्रोद्योगातील सायझिंग, प्रोसेससह अन्य घटकांवर होत आहे.
भारतीय बाजारपेठेत सध्या तयार कपड्यांना अपेक्षित मागणी नाही. परिणामी, शहरात तयार होत असलेल्या ग्रे कापडाची मागणी थांबली आहे. त्यामुळे कापड उत्पादकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रातील कापड निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे सध्या कापड आणि सूत बाजाराची परिस्थिती खूपच वाईट आहे.
रॅपिअर व एअरजेट या अत्याधुनिक यंत्रमागावर मजुरीने कापड विणून दिले जाते. व्यापारी वर्गाकडून त्यासाठी सूताची बिमे पुरवली जातात. पण कापडालाच मागणी नसल्यामुळे बिमांचा पुरवठाच बंद होत चालला आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी कारखाने बंद ठेवण्याची वेळ येत आहे. जे स्वतः कापड उत्पादित करून विक्री करतात, पण त्यांच्याकडे कापडाची मागणीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कापडाचे कमी उत्पादन घेतले जात आहे. परिणामी, कापड उत्पादनात घट होतांना दिसून येत आहे.
वस्त्रोद्योगातील सायझिंग आणि प्रोसेस उद्योगांनाही याची झळ बसतांना दिसत आहे. या दोन्ही उद्योगात क्षमतेने काम करणे अशक्य होत चालले आहे. याच बरोबर कामगारांच्या वेतनावर परिणाम होत आहे. तर या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या घटकांना मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून कापड निर्यातीवर भर दिल्यास वस्त्रोद्योगाला एकप्रकारे दिलासा मिळेल, अशी आशा असल्याचे वस्त्रोद्योगातील जाणकारांनी सांगितले. एकूणच सध्या तरी कापडाला अपेक्षित मागणी कधी येणार याच्या प्रतीक्षेत यंत्रमाग उद्योजक आहेत.
सूतगिरण्यांना मोठा फटका
वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या सूतगिरण्यांसमोर तर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. कापडाचे वाढते दर आणि सूताचे उतरते दर यांचा मेळ घालतांना दमछाक होत आहे. आठवड्यातील किमान तीन – चार दिवस सूत उत्पादन बंद ठेवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहिलेला नाही. त्यामळे सूतगिरण्यांना सध्या तरी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
साध्या यंत्रमागांना किमान दिलासा
साध्या यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या कांही प्रकारच्या कापडांना मागणी आहे. मात्र सूत दरातील सततच्या घसरणीमुळे अपेक्षित गती येतांना दिसत नाही. गेल्या दोन- तीन आठवड्यापासून दररोज सूताचे दर घसरत आहेत. मात्र तुर्तास तरी या मंदीच्या वातावरणात किमान साध्या यंत्रमागधारकांना दिलासा मिळत आहे.
सध्या वस्त्रोद्योगात मंदीचे वातावरण जाणवत आहे. पण पुढील कालावधीत विविध सण सुरू होणार आहेत. त्यामुळे कापडाला मागणी वाढण्याची आशा आहे. तसेच शासनानेही निर्यात वाढीवर भर देण्याची गरज आहे.
– चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन