fbpx
Site logo

Shri Krishna Janmashtami : ‘महाभारतात अर्जुन युद्धाला घाबरला अन् श्रीकृष्णानं त्याला युद्ध करण्यास प्रवृत्त केलं’

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

कोल्हापूर : भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञान, भक्ती, कर्म व योग या साऱ्यांचा सर्वोच्च आविष्कार. मेंदू, हृदय व हात यांच्या शक्तीचा विकास कसा करून घ्यावा आणि या विकासाच्या सहाय्याने मोक्षाची किंवा पूर्णत्वाची प्राप्ती कशी करून घ्यावी, यासंबंधीची शिकवण गीतेत दिली आहे.

भगवान श्रीकृष्ण, श्रीमद्‌भगवद्‌गीता (Bhagavad Gita) आणि वर्तमान अशा अनुषंगाने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या (Shri Krishna Janmashtami) निमित्ताने साधलेला हा संवाद. संत साहित्याचे अभ्यासक, लेखक सुहास लिमये सांगतात, ‘‘महाभारतात अर्जुन युद्धाला घाबरला आणि श्रीकृष्णाने त्याला युद्ध करण्यास प्रवृत्त केले, असा समज आजही आहे; मात्र श्रीकृष्णाने युद्ध होऊच नये, यासाठी केलेल्या शिष्टाईवर फारशी चर्चा होत नाही.

पाच पांडव विरुद्ध शंभर कौरव असे या युद्धाचे स्वरूप; पण त्यामुळे लक्षावधी सैनिक मारले जातील आणि हे युद्ध मानवजातीसाठी मारकच असेल, अशी भूमिका श्रीकृष्णाने घेतली होती.’’ लिमये सांगतात, ‘‘महाभारतातील (Mahabharat) उद्योग पर्वामध्ये श्रीकृष्णाने शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे तर विराट पर्वामध्ये पांडव अज्ञातवासात असताना बृहन्नडेच्या वेशातील अर्जुनाने कौरवांशी केलेल्या युद्धाचे वर्णन आले आहे.

त्यात त्याने भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन या सर्वांचा पराभव केला होता. अर्जुन युद्धाला अजिबात घाबरलेला नाही; मात्र युद्धामध्ये कितीही धन, वैभव प्राप्त झाले तरी त्याने मनाचे समाधान होणार नाही, हे त्याला कळले होते. थोडक्यात मानवी मनाची अधिकाची आस, तृष्णा संपणार नाही, हे त्याला कळले होते. म्हणूनच श्रीकृष्णाला ‘माझा मोह तू नष्ट कर’ असे तो विनवतो.

माऊली ज्ञानोबाराय अर्जुनाच्या आंतरिक स्थितीचे वर्णन करतात, ‘‘एथ पृथ्वीतळ आपु होईल । हे महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसीचा ॥’’ थोडक्यात मानवी जीवनातील सर्व अनर्थांचे मूळ असणारा ‘मोह’ कसा नाहीसा करता येईल, याचे उत्तर म्हणजे श्रीमद्‌भगवद्‌गीता!’’

प्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ प्रदीप पवार सांगतात, ‘‘श्रीकृष्ण गीतेच्या माध्यमातून आपल्याला जे सांगतात ते पूर्ण वेदांत आहे. म्हणूनच गीतेला उपनिषद म्हटले आहे. वेदांताची शिकवण हीच आहे की, आपण तत्त्वतः कोण आहोत, हे ओळखले पाहिजे. आपण आपल्याला समजत असलेले केवळ शरीर आणि मन नसून ज्यामुळे हे शरीर, मन निर्माण होते ते ‘आत्मतत्त्व’ आहोत.

जी व्यक्ती या आत्मतत्त्वाबद्दल जागरूक होते ती जीवनमुक्त होते. या तत्त्वाची जाणीव आपण ज्या वेळेस जगत, मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या ‘अलीकडे’ जातो त्याच वेळेस होऊ शकते आणि तिथे जाणे हे फक्त वर्तमानामध्येच होऊ शकते.’’

पवार सांगतात, ‘‘जी व्यक्ती वर्तमानामध्ये राहू शकते ती त्याच्या ‘दूषित मनाच्या’ मगरमिठीतून अलगदपणे सुटू शकते आणि जीवनामध्ये आनंद, स्वास्थ्य आणि समृद्धी अनुभवू शकते. जी व्यक्ती या वर्तमानाचा वेध घेऊ शकते ती व्यक्ती दूषित मनापासून विभक्त झाल्यामुळे अंतर्बाह्य स्वस्थ होते. ज्यामुळे तिचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य पूर्णपणे आरोग्यसंपन्न आणि संतुलित होऊ शकते. म्हणूनच अध्यात्मामध्ये वर्तमानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही एक साधना आहे आणि नित्यपणे जागरूक राहूनच ही विकसित केली जाऊ शकते.’’

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: