Source: Pudhari Kolhapur
पुढारी ऑनलाईन डेस्क : आज ६१ वी गोकुळ संघाची सर्वसाधारण सभा आहे. दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या सभास्थळी मोठा राडा झाला. ही सभा सुरु होण्यापूर्वीच महाडिक गट आक्रमक दिसून आला. यावेळी सभासदांनी बॅरिगेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. (Kolhapur News)
गोकूळ दूध संघाच्या सभेसाठी शौमिका महाडिक दाखल झाल्या. सभास्थळाबाहेर सभासदांची मोठी गर्दी झालीय. शाहूवाडी, भूदरगड तालुक्यातून आलेले सभासद ताटकळत उन्हात थांबले आहेत. सभेमधील अर्धे सभासद बोगस आहेत. आतमध्ये पोहोचलेल्या सभासदांना झेरॉक्स कॉपी देण्यात आल्या. खरे सभासद नको म्हणून बॅरिकेट्स लावले, असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.
संबंधित बातम्या
ही सभा उधळून लावण्यासाठी शौमिका महाडिक हे आरोप करत आहेत. सभा उधळून लावण्यासाठी शौमिका महाडिकांनी गुंड आणले, असा प्रत्यारोप सतेज पाटील यांनी यावेळी केला.
गोकुळ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी (दि. १५) होत आहे. सभेच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर हल्लाबोल केला होता. दरम्यान, सभा सुरळीत पार पाडण्यासाठी सत्ताधार्यांच्या वतीने तयारी करण्यात आली असली, तरी आज सकाळी सतेज पाटील गट आणि महाडिक गट आक्रमक झाले. सभा सुरु होण्यापूर्वीच दोन्ही गटात राडा झाला.
दरम्यान, सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाच हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. बाजूला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून ७५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
गतवर्षी सभेच्या ठिकाणाचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी वातावरण तापविले होते. यावर्षी ‘गोकुळ’ने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना परिसरातच सर्वसाधारण सभा ठेवली आहे. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’चा कारभार चांगला चालला आहे, हे सांगत सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. सभेच्या पूर्वसंध्येलाच संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधार्यांच्या कारभारावर हल्लाबोल करत कारभार सुधारा; अन्यथा ‘गोकुळ’चा शेतकरी संघ होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सभेच्या निमित्ताने वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.
हे ही वाचा :