Source: Sakal Kolhapur
व्यावसायिकता अंगीकारा फुटबॉलमध्ये करिअर करा..! सकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. ५ : कोल्हापूरचे वर्तुळ भेदून भारतीय संघ व परराज्यांतील क्लबकडून खेळल्यानंतर काय होऊ शकते, याचा दाखला येथील फुटबॉलपटू अनिकेत जाधव याने दिला आहे. तो ईस्ट बंगालशी तब्बल दोन कोटी ३५ लाखांना करारबद्ध झाला. ही रक्कम इथल्या फुटबॉलपटूंच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. केवळ अस्मितेपोटी पेठ किंवा एखाद्या संघाकडून खेळण्यापेक्षा व्यावसायिकता अंगीकारली तरच फुटबॉल करिअरचा चांगला मार्ग होऊ शकतो, असा कानमंत्र ज्येष्ठ फुटबॉलपटू देत आहेत. चांगला खेळाडू असेल तर एस. टी. वा कोल्हापूर महापालिकेच्या संघात त्याला स्थान मिळायचे. त्याच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागायचा. दोन्ही संघ बंद झाल्याने खेळाडूंना नोकरीचा शाश्वत मार्ग आता उपलब्ध नाही. या आधी फुटबॉलमधील कौशल्याच्या जोरावर अकबर मकानदार कस्टम, किशोर खेडकर, शिवाजी पाटील, विजय कदम आरसीएफ, विश्वास कांबळे युनियन बँक, बबन थोरात, सुरेश कदम, सतीश पोवार, राजू पोवार यांना एस. टी.मध्ये नोकरी मिळाली. महापालिकेच्या सेवेत तर अनेक खेळाडूंचा समावेश होता. त्यात दिलीप माने, श्रीनिवास जाधव, मंगल शिंदे, बाजीराव मंडलिक, एस. वाय. सरनाईक, बाबू पाटील अशी अनेक नावे सांगता येतील. त्याचबरोबर अनेकांची पोलिस सेवेत वर्णी लागली. आता मात्र पोलिस भरतीच्या आशेवर असलेल्या खेळाडूंना भरतीची प्रतीक्षा आहे. सरकारी नोकरीची शाश्वतता कमी झाल्याने खेळाडूंना व्यावसायिकतेशिवाय पर्याय राहिलेला नाही. तरीही केवळ पेठ व संघाविषयी असलेल्या अस्मितेपोटी शहरातील बहुतांश खेळाडू अल्प मानधनावर खेळत आहेत. या उलट ज्यांनी कोल्हापूर सोडून परजिल्हा व परराज्यांतील संघात खेळण्याचे स्वप्न बाळगले, त्यांना आर्थिक फायदा झाला. अनिकेतने व्यावसायिकतेला प्राधान्य दिल्याने करिअर घडविण्याचा उत्तम मार्ग दाखविल्याची प्रतिक्रिया जाणकारांतून व्यक्त होत आहे.
निखिल कदम व अनिकेत जाधव यांनी निवडलेला मार्ग सर्वोत्तम आहे. कोल्हापूरच्या खेळाडूंत गुणवत्ता असून, त्यांनी अन्य जिल्ह्यांतील ॲकॅडमीमधून खेळायला हवे. कारण तिथले प्रशिक्षक जो उत्कृष्ट खेळतो, त्याला पाठिंबा देणारे असतात. कोल्हापूरच्या ज्या खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करायचे आहे, त्यांनी ॲकॅडमीत प्रवेश करावा. – किशोर खेडकर, ज्येष्ठ फुटबॉलपटू
कोल्हापूरच्या खेळाडूंनी संतोष ट्रॉफी स्पर्धा खेळायलाच हवी. त्यातून त्यांच्या नोकरीची संधी उपलब्ध होते. केवळ कोल्हापुरात फुटबॉल खेळून चालणार नाही. परराज्यातील क्लबशी संपर्क ठेवून तेथे खेळण्याची संधी त्यांनीच उपलब्ध करायला हवी. – अकबर मकानदार, ज्येष्ठ फुटबॉलपटू