Source: Sakal Kolhapur
कुडित्रे- परिवर्तन झाले नाही, तर कुंभीला देवही वाचवू शकणार नाही, असे म्हणणारे विरोधी आघाडीचे अहंकारी प्रमुख बाळासाहेब खाडे आता देवापेक्षा मोठे झाले का? असा सवाल करून गेली १८ वर्षे देवाचा आशीर्वाद नरके पॅनेलच्या पाठीशी आहे.
येत्या निवडणुकीत भोगावती कारखान्यात परिवर्तन करायचे आहे, याचा विसर पडू देऊ नका, असे जाहीर आव्हान चंद्रदीप नरके यांनी दिले. खुपिरे येथे झालेल्या नरके पॅनेलच्या सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आनंदा जगदाळे होते.एकनाथ चौगले, रामकृष्ण पाटील, के. डी. पाटील, कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर, तानाजी पाटील, पुंडलिक पाटील, पी. डी. पाटील, चंद्रकांत पाटील, आशुतोष गायकवाड यांची भाषणे झाली.
गोकुळचे संचालक अजित नरके, एस. आर. पाटील, रवींद्र मडके, इंद्रजित पाटील, सरदार मिसाळ, शिवाजी कुडाळकर, अजित पाटील उपस्थित होते. स्वागत संचालक संजय पाटील, तर प्रास्ताविक युवराज पाटील यांनी केले. आभार शिवाजी गुरव यांनी मानले.
‘सभासदांची साथ मिळेल’
दरम्यान, आज प्रचाराचा समारोप झाल्यानंतर कुंभीचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी पत्रकार परिषद घेऊन, ‘सभासद आपल्याला साथ देतील’, असा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके उपस्थित होते.
नरके म्हणाले, ‘‘कुंभी कारखाना कसा आर्थिक अडचणीत आहे हे भासवण्याचे काम विरोधक करत आहेत. कारखाना आपल्या ताब्यात येईल ही त्यांची भ्रामक कल्पना असून या निवडणुकीत त्यांच्याकडून व्यक्तीद्वेष दिसून आला.’’