Source: Sakal Kolhapur
कोल्हापूर- शेती, श्रम संस्कृतीत बैलाला कष्टाचा मानकरी ठरवलं. मानवाने बैलांना व बैलांनी मानवाला जागवण्याचा आधार दिला. या जाणिवेचा मोजकाच वर्ग आजही बैल वापरतोय. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी साखर कारखान्याला येणाऱ्या ४० हजार बैलगाड्यांची संख्या सध्या १२ हजारांवर आली. यातून तंत्रज्ञानाने अनेकांचे जगणे पुढे ओढले; पण तंत्रज्ञान सोबत नसलेल्यांना बैलानं जगवलं. याची रात्रीच्या फेरफटक्यात दिसली.
ऊस वाहतुकीसाठी स्थानिक, मराठवाडा, कर्नाटक सीमा भागातील बैलगाडीवानांना साखर कारखान्यांनी ठेका देत रोजगार दिला. यात दालमिया शुगरच्या दोन बैलगाड्या चिखलीच्या शेतात ऊस भरून सायंकाळी सहाला निघाल्या.
दोन किमी पाणंद रस्ता सहज चालून बैलगाड्या डांबरी सडकेवर आल्या. तशी चाकांची गती सैल झाली; पण बैलांची पावलं ताठ होऊन सावध पडू लागली. मातीच्या रस्त्यात पाय रुततात. अवजड बैल घसरत नाही. तो शेत पाणंदीतून सहज चालतो. डांबरी रस्त्यावर बैलांचे पाय घसरताना ते अधिक सतर्क होत हळूवार व जपून पावलं टाकत पन्हाळा रस्त्याने चालू लागले.
गाडीवान राघूने चाबूक बाजूला ठेवत ‘धीरानं हुयी’ अशी ओरोळी दिली. तरीही बैल आपल्याच गतीत चालू लागले. साडेसातला बैलगाडीने कारखान्याचा गाडी अड्डा गाठला.याच वेळी अन्य बैलगाड्या रात्री साडेनऊला पालांवर आल्या. कारखाना पालस्थळी गड्यांनी बैलं बांधली.
वाड्याची वैरण टाकली. धुरी पेटवत डासांचा उपद्रव हटवला, चगाळा पेटवून धग दिली. बैलांना पाण्याच्या दोन-तीन बादल्या दाखवल्या. बैलांच्या पाठीवर मायेनं हात फिरवला. दिवसभर राबून शीणलेल्या बैलांनी चारा खात, रवंथ करीत शांतपणे फतकले मारले. रात्री अकराला पशुवैद्यकांनी एका फेरीत बैलांची प्रकृती तपासली. तशी पालांवर जवळपास पंचवीसभर बैलांची गाढ विश्रांती सुरू होती.
रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटे सहाला बैलगाडी शेताकडे जाणार व सहा तास ऊस ओढणार. आठ तास काम, १४ तास विश्रांती व कामाचे नियोजन केलं, तरच बैल तंदुरुस्त राहतो, काम ओढतो. रोजगार लाभतो. बैलाचं, आमचं जगणं सोपं होत असल्याचा भाव बैलगाडीवानांनी व्यक्त केला.