Source: Sakal Kolhapur
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या (Kolhapur District Co-Operative Milk Producers Union) अध्यक्षपदी अरुण गणपतराव डोंगळे (Arun Dongle) यांची बिनविरोध निवड झाली. दुग्धचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
निवडीसाठी विश्वासराव पाटील सूचक, तर नविद मुश्रीफ अनुमोदक होते. गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयात निवड प्रक्रिया झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी साउंड सिस्टिमच्या तालावर गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावर्षी प्रथमच बंद पाकिटातून नाव पाठविण्याची प्रथा खंडित झाली.
गोकुळ (Milk Brand Gokul) अध्यक्षपदाचा विश्वास पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर डोंगळे यांना संधी दिली जाणार होती. विश्वास पाटील अध्यक्ष होताना दोन वर्षांनंतर डोंगळे यांना संधी दिली जाणार होती. त्यानुसार आज डोंगळे यांनी अध्यपदाची सूत्रे घेतली. दरम्यान, सकाळपासून कार्यकर्त्यांनी गोकुळच्या मुख्य कार्यालयात डॉल्बीसह हजेरी लावली. ‘डोंगळे समर्थक’ असे नमूद केलेल्या टोप्या कार्यकर्त्यांनी घातल्या होत्या. डोंगळे यांची चारचाकीमधून मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीतील प्रत्येक वाहनाच्या काचेवर अरुण डोंगळे यांचे चित्र साकारले होते. निवडीनंतर ‘गोकुळ’च्या दारात कार्यकर्ते आणि समर्थकांनी ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर ठेका धरत मशिनद्वारे गुलालाची उधळण केली. याच सोबत डोंगळे यांच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्ते कागल मार्गे घोटवडे येथे रवाना झाले. दरम्यान, ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे. दोन वर्षानंतर एक वर्षासाठी नवीन संचालकाला संधी दिली जाणार आहे. मात्र, ही संधी कोणाला मिळणार याचीही या वेळी चर्चा झाली.