Source: Sakal Kolhapur
आपटी : पन्हाळा किल्ल्यावर (Panhala Fort) बुधवारी (ता. २४) मध्यरात्री दोन ते पहाटे चारच्या सुमारास धार्मिक स्थळाची मोडतोड करण्याचा प्रकार घडला. या परिसरात पहाटे फिरायला येणाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ त्या धार्मिक स्थळाची (Religious Place) डागडुजी केली.
या घटनेमुळे पन्हाळा परिसरात संचारबंदीसदृश वातावरण होते. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशासनाने सर्वांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. पन्हाळा किल्ल्यावरील नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत स्वेच्छेने दुपारपर्यंत सर्व बाजापेठ आणि व्यवहार बंद ठेवले.
पन्हाळा किल्ल्यावर काही धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. या परिसरात काल पहाटे फिरायला येणाऱ्यांना धार्मिक स्थळाची मोडतोड झाल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना (Kolhapur Police) कळविली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत त्या परिसरात कोणीही जाऊ नये, याची खबरदारी घेतली. स्थानिक प्रशासनाने तत्काळ मोडतोड झालेल्या भागाची डागडुजी करायला सुरुवात केली. पूर्वीसारखे बांधकाम तेथे करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
नेहमी पर्यटकांनी गजबजलेल्या पन्हाळा किल्ला परिसरात काल निरव शांतता होती. पोलिसांनी बुधवार पेठेपासूनच नाकाबंदी केली होती. किल्ल्यावर कोणालाही सोडले जात नव्हते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पोलिस नागरिकांना आधार कार्ड पाहूनच गडावर सोडत होते. घटनास्थळ परिसरात संचारबंदी लागू केली होती. सकाळी सातपासून डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, प्रांत समीर शिंगटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधीक्षक बलकवडे यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर या संदर्भातली पोस्ट व्हायरल झाली होती. पन्हाळा ग्रामस्थांनी या ठिकाणी बंदोबस्त द्यावा, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली होती; मात्र बंदोबस्त देण्यात आला नाही. याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पैकी एक स्थानिक आहे. घटनास्थळाबाबत या आधी पोस्ट व्हायरल केली होती, अशांची चौकशी केली जाणार आहे. दहा ते बारा जणांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. रात्री गडावर कोणत्या गाड्या आल्या, हे सीसीटीव्हीच्या आधारे पाहून शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकाराची माहिती पन्हाळा परिसरात समजल्यावर नागरिकांनी सामाजिक सलोखा राखत उत्स्फूर्तपणे पन्हाळ्यावरील बाजारपेठ बंद ठेवली. दुपारपर्यंत सर्व व्यवहार बंद होते.