Source: Sakal Kolhapur
कोल्हापूर : जयसिंगपूर (Jaysingpur) येथील एसटी स्टँडमधील रि.स. १२६६ या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे (Dr. Babasaheb Ambedkar Statue) भूमिपूजन करण्यात आले. मात्र, ही जागा अयोग्य आहे. जयसिंगपूर येथील रि.स.१२५१ ही जागा जुन्या न्यायालयाची असून ती स्मारकासाठी द्यावी, अशी समितीची मागणी असून याबाबतचा ठराव नगरपरिषदेने दिला आहे.
त्यामुळे याच ठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पुतळा असावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलकांनी हा रस्ता बराच काळ अडवून धरला होता. प्रशासनाने पत्र दिल्यावर येथील आंदोलन थांबवण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा समितीच्या निवेदनातील माहितीनुसार, जयसिंगपूर येथील जुने कोर्ट (Jaysingpur Court) असणाऱ्या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, अशी समितीची मागणी आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पुतळा, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका प्रस्तावित आहेत. या जागी स्मारक व्हावे, यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून वारंवार आंदोलन केले.
नगरपरिषदेने याबाबतचा ठराव दिला. मात्र आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी एसटी स्टँडमध्ये पुतळ्याचे भूमिपूजन केले. ही जागा डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी अयोग्य आहे. तेथे स्वच्छता नाही. त्यामुळे हा पुतळा स्मारकाच्या प्रस्तावित जागेतच बसवावा. असे न झाल्यास समिती उग्र आंदोलन करेल.
दरम्यान, समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जयसिंगपूर येथून निघाले. येथील दसरा चौकातून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. संबंधित जागेवरील पुतळ्याचे नियोजन रद्द करून स्मारकाच्या जागेत पुतळा बसवावा, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत याबाबतचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने त्यांना पत्र दिले. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यावर याबाबतची योग्य कार्यवाही करू, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कैलास काळे, आदमभाई मुजावर, श्रीपती सावंत, रमेश शिंदे, स्वाती सासणे, साजिदा घोरी, मनीषा पोवार, विश्वजीत कांबळे, अमित वाघवेकर, सचिन कांबळे यांनी केले.