Source: Pudhari Kolhapur
कोल्हापूर, राजेंद्र जोशी : विघ्नहर्त्याच्या प्रतिष्ठापनेसाठी पंचांगकर्त्यांनी दोन विभिन्न मते दिल्यामुळे गणेश भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मराठी माणसांना धार्मिक विधीविषयी प्रदीर्घकाळ मार्गदर्शन करणार्या पंचांगकर्त्यांनी मंगळवारी चतुर्थी येत असल्याने त्याच दिवशी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्याच्या मतावर शिक्कामोर्तब केले आहे.
हिंदू धर्मामध्ये विविध धार्मिक कार्यांसाठी पंचांगांचा आधार घेतला जातो. यामध्ये निर्णयसागर, रूईकर, लाटकर, सोमण, दाते, साळगावकर, राजंदेकर आदी पंचांगांचा वापर केला जातो. या पंचांग दिनदर्शिकेत मंगळवारी गणेश चतुर्थीची तिथी दिली आहे. तथापि, अन्य पंचांगांत 18 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याचे नमूद केल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे गणपतीची प्रतिष्ठापना केव्हा करायची, असा प्रश्न विचारला जातो आहे.
यावर रूईकर पंचांगकर्ते श्रीगुरू रूईकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, संभ्रम निर्माण करणारे सूर्यसिद्धांत ग्रंथावरून गणित करतात, ते गणित स्थूल असते. (म्हणजे जसे आकाशात तसे पंचांगात आणि जसे पंचांगात तसेच आकाशात दिसते). 18 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याचे सांगणारे पंचांग हे चुकीच्या गणितावर केलेले असते. त्यांची तृतीया समाप्ती 18 सप्टेंबरला सकाळी 10.53 वाजता होते, तर आमच्या पंचांगांप्रमाणे ती दुपारी 12.40 वाजता होते. मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थी दुपारी 1.44 वाजता संपते. मंगळवार, 19 सप्टेंबर रोजीच मध्यान्हाला चतुर्थी असल्याने याच दिवशी गणेश चतुर्थी दिलेली आहे. ती बरोबर आहे.’