Source: Sakal Kolhapur
निपाणी : निपाणी तालुक्यात (Nipani Taluka) दुधगंगा, वेदगंगा आणि पंचगंगा नदी काठावरील सुमारे २३ गावांना अतिवृष्टी काळात महापुराचा धोका उद्भवतो. संभाव्य पावसाळ्यात अतिवृष्टी आणि महापूर (Monsoon Floods) स्थिती निर्माण झाल्यास तालुक्यातील वेगवेगळ्या गावात जवळपास ४५ ठिकाणी पूरग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी निवारा केंद्रे सज्ज ठेवली जाणार असल्याची माहिती तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
महापुरासह आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल जिल्हा प्रशासनाने येथील तहसील कार्यालयाकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार तहसील कार्यालयाने पूरस्थितीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. महाराष्ट्रातील धरणातून (Maharashtra Dam) सुमारे ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला तर २३ आणि १ लाख क्युसेक पाण्याचा या नद्यांमध्ये विसर्ग झाल्यास तालुक्यातील बहुतेक गावांना महापुराचा धोका टाळता येत नाही, असेही अहवालात म्हटले आहे.
सध्या उन्हाळा संपण्याच्या टप्प्यात असून पावसाळा येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने आता अतिवृष्टी आणि महापूर काळात समस्या निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या टप्प्यात तहसीलदार विजयकुमार कडकोळ यांनी तालुक्यातील सर्व खात्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूर नियंत्रण बैठक घेऊन सूचना केल्या आहेत.
तालुका प्रशासनाने दिलेल्या अहवालात महापूर काळात किंवा आपत्कालीन स्थितीत मदतकार्यासाठी येथे एकही बोट नसल्याचे सांगितले आहे. पूरग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी ४५ ठिकाणी निवारा केंद्रे सज्ज असतील. त्यात ज्या-त्या गावातील सरकारी शाळा, भवन, अंगणवाडी, वस्ती शाळांचा समावेश आहे.
बुदिहाळ, यमगर्णी, भिवशी, जत्राट, सिदनाळ, ममदापूर, हुन्नरगी, कुन्नूर, बारवाड, कारदगा, मांगूर, सुळगाव, कोगनोळी, सौंदलगा, जैनवाडी, बोळेवाडी, बेनाडी, भाटनांगनूर, कुर्ली, शिरदवाड, भोज, बोरगाव.