Archives

Coronavirus News: आज तर आकाशात ‘काळे’ कावळेही दिसले नाहीत; संजय राऊतांकडून भाजपाची खिल्ली

मुंबईः कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. त्याचाच भाग म्हणून, ‘माझं अंगण रणांगण’ म्हणत राज्यभरातील भाजपाच्या नेत्यांनी आज आपापल्या घरासमोर निदर्शनं केली. काळ्या फिती लावून, काळे झेंडे उंचावून त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. अनेकांनी काळ्या रंगाचा मास्क लावून फलक दाखवले. या आंदोलनावरून, सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाच्या या निदर्शनांची खिल्ली उडवली आहे.  

 

भाजपाचं आंदोलन पूर्णतः फसलंय. त्यात केवळ भाजपा  नेते होते. जनता त्यात सहभागी झालीच नाही. किंबहुना आज तर आकाशात कावळेही दिसले नाहीत. काळे. त्यांचं ते काळं आंदोलन आहे ना?. बहुतेक आज कावळे घरट्यांमध्ये बसलेत. त्यांच्यावर कुठला ठपका नको म्हणून, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या, काळे बनियन घालून आंदोलन केलं असतं तर महाराष्ट्रानं त्यांची पाठ थोपटली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोरोना संकटात विरोधी पक्षच अपयशी ठरलाय आणि म्हणून ते स्वतःच स्वतःविरोधात आंदोलन करत आहेत. 
सरकार अपयशी ठरलंय असं या काळात सांगणं महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण एक युद्ध लढतोय. त्यात पुढे जात असताना अशा प्रकारे अडथळे निर्माण करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही, असंही त्यांनी सुनावलं.

महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्यासाठी युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र, डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल, अशा शब्दांत शिवसेनेनं मुखपत्रातून भाजपाला डिवचलं होतं. भाजपा नेते आशीष शेलार यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे?, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर, आंदोलन अपयशी ठरल्यानं भाजप नेत्यांचा जळफळाट होत असल्याचा चिमटा राऊत यांनी काढला.

दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते  आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे. कोरोनाला विसरुन राजकारण प्रिय असल्याचं भाजपाने दाखवून दिलंय, कोरोना को भूल गए, पॉलिटिक्स प्यारा है, असं त्यांनी ट्विटरवरून सुनावलंय. त्यामुळे पुढचे काही दिवस दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरूच राहण्याची चिन्हं आहेत. फक्त या वाक् युद्धात कोरोनाविरुद्धचं युद्ध मागे पडायला नको म्हणजे मिळवलं, एवढीच जनतेची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्याः
    
सत्तेची लालसाच नेत्यांना ‘हे’ करायला लावते, आदित्य ठाकरेंनी भाजपावर सोडला टीकेचा बाण

ही तर डोमकावळ्यांची फडफड, भाजपाला शिवसेनेचा सामनामधून टोला

भाजपा नेते ठाकरे सरकारच्या विरोधात, देवेंद्र फडणवीस, खडसे, राणे दिसले आंदोलनात

थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार

भाजपच्या नेत्यांना जडलाय निद्रानाश, जयंत पाटील यांचा आरोप

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • chat
    Add a comment
    eZy Kolhapur

    FREE
    VIEW