Source: Sakal Kolhapur
लिफ्ट दिलेल्या दुचाकीस्वाराला धमकावून लुटणाऱ्या दोघांना अटक सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः लिफ्ट दिलेल्या दुचाकीस्वाराला धमकावून लुटणाऱ्या दोघांना आज राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. सागर भगवान गणाचार्य (वय २४, रा. राजारामपुरी चौथी गल्ली) आणि अक्षय धनाजी भाले (२५, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. याबाबत १८ मे रोजी नेर्ली (ता.करवीर) येथील सुनील मारुती नाईक यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसापूर्वी फिर्यादी नाईक हे दुचाकीवरून रात्री साडेअकराच्या सुमारास पार्वती टॉकीज चौकातून जात असताना त्यांच्याकडे एकाने लिफ्ट मागितली. तेथे लिफ्ट घेवून पुढे जाताना शाहू मिल चौकातून अन्य तरुणाने दुचाकी थांबविण्यास भाग पाडले. तेथे लिफ्ट दिलेला आणि अन्य अनोळखी दोघांनी मिळून त्यांच्याकडील मोबाइल हॅण्डसेट आणि रोख १२० रुपये काढून घेतले. याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांना दोघांचा शोध घेवून त्यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.————-
मध्यवर्ती बसस्थानकांतूनअडीच लाखांचे दागिने चोरीस
कोल्हापूर, ता २० ः मध्यवर्ती बसस्थानकात एसटी बस पकडत असताना महिलेची सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्याने लंपास केली. अहमदनगर येथील प्रवाशाने याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गुरुवारी (ता.१८) सायंकाळी पाच वाजता फिर्यादी संतोष सावळेराम गायकवाड (चितळी स्टेशन,अहमदनगर) हे कुटुंबियांसह १८ मे रोजी मध्यवर्ती बसस्थानकात आले होते. एसटी बसमध्ये जात असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पर्स लंपास केली. यात पाच तोळ्यांचे गंठण, एक तोळ्याचे झुबे, सोन्याचे वेल असे आठ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.