Source: Sakal Kolhapur
‘हेल्पर्स”च्या स्वप्ननगरी प्रकल्पाची धुरा आता ‘साहस”कडे
कोल्हापूर, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे येथील हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेचा स्वप्ननगरी प्रकल्प एक मे पासून साहस डिसॅबिलीटी रिसर्च ॲन्ड केअर फाऊंडेशनला चालवण्यास दिला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. डी. देशपांडे यांनी दिली. स्वप्ननगरी प्रकल्पात लाजवाब काजू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र, अपंगार्थ वसतिगृह, शेती आदी कार्यकेंद्रे २०१६ पासून हॅण्डिहेल्प वेल्फेअर फाउंडेशनद्वारे चालवली जात होती. गेल्या सलग सहा वर्षांत ‘हॅण्डिहेल्प”ला विविध कारणांनी सतत तोटा झाल्याने व गेली चार महिने प्रक्रियेचे जॉब वर्क काम मिळू न शकल्याने या प्रकल्पात आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. ‘हॅण्डिहेल्प”चे संचालक मंडळ काम मिळवण्याचे तसेच या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कसोशीचे प्रयत्न ‘हेल्पर्स”च्या सहकार्याने करीत होते. काम मिळून पगाराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी संचालक मंडळाने एक एप्रिलपासून पुढील सूचना देईपर्यंत तेथील सर्वांच्या कुटुंबीयांसह मोफत जेवणाची व्यवस्था आणि निर्वाह भत्ता देण्याचे सूचित केले होते. मात्र २ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे कायमस्वरूपी पूर्ण पगाराचा आग्रह धरला. त्यामुळे ८ एप्रिलला प्रकल्पस्थळी बैठक झाली. पुढे ११ एप्रिलला ६० कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी त्यांच्या सामूहिक स्वाक्षरीनिशी साहस संस्थेच्या अध्यक्ष डॉ. नसीमा हुरजूक यांना पूर्ण स्वप्ननगरी प्रकल्प चालविण्यास देण्याबाबतचे निवेदन ‘हँडीहेल्प”ला पाठविले. कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार हेल्पर्स व ‘हँडीहेल्प”ने डॉ. नसीमा हुरजूक यांच्याशी याबाबत संपर्क साधला. त्यानंतर चर्चा होऊन१२ एकर जमिनीवरील संपूर्ण स्वप्ननगरी प्रकल्प, त्यातील सर्व इमारती, यंत्रसामुग्री व साधनांसह साहस संस्थेस अपंग पुनर्वसनाच्या उद्दिष्टाची समानता लक्षत घेऊन पाच वर्षे मुदतीसाठी मोफत चालवण्यास देण्याचा निर्णय झाला, असेही श्री. देशपांडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.