Source: Sakal Kolhapur
हेर्लेतील प्रार्थनास्थळाचे बेकायदेशीर बांधकाम हटविले
हातकणंगले, ता.२ः हेर्ले (ता. हातकणंगले) येथील संजयनगरमधील वादग्रस्त ठरलेल्या प्रार्थनास्थळाचे बेकायदेशीर बांधकाम अखेरीस आज, मंगळवारी सकाळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात प्रशासनाने हटविले. महापुरुषांच्या फलकाची विटंबना झाल्याने व संजयनगर येथे बेकायदेशीर प्रार्थनास्थळाचे बांधकाम केल्याच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतीवर २५ एप्रिल रोजी सकाळी धडक दिली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकामाची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र कोणीही हा निर्णय ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी हिंदुत्ववादी कार्यकर्ते व महिलांनी बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन चार दिवस गाव बंद ठेवले. ग्रामस्थांनीही या घटनेचा निषेध करीत गाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद देत गाव बंद यशस्वी केला. याचे लोण तालुक्यांतील अनेक गावांत पसरल्याने अनेक गावांनीही बंद पाळला. दरम्यान, संजयनगर येथील बेकायदेशीर प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी ग्रामपंचायत निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याने येथील महिला व नागरिकांनी जिल्हा पातळीवरील प्रशासनास भेटून बेकायदेशीर प्रार्थनास्थळ हटवण्याची मागणी केली. या मागणीची जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. १ मे रोजी सकाळी केंद्र शाळेमध्ये गावामध्ये शांतता, बंधुभाव,जातीय सलोखा राहावा यासाठी हातकणंगले पोलिस ठाण्याने सामाजिक सलोखा बैठक आयोजित केली होती. अपर पोलीस अधीक्षक निकेश खारमोटे यांनी गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवावा, असे ग्रामस्थांना आवाहन केले. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्यासह हातकणंगले पोलिस ठाण्याचे प्रमुख , तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.या बेकायदेशीर बांधकामांबाबत सर्व अहवालांची शहनिशा करून प्रशासनाने निर्णय घेत आज, २ मे मंगळवारी रोजी पहाटे पाच वाजता या प्रार्थनास्थळाचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत संबंधितांना कारवाईची माहिती दिल्यानंतर संबंधितांनी प्रशासनाला विरोध केला. मात्र सर्व विरोध मोडून काढत प्रशासनाने अखेरीस हे बांधकाम हटविले. कारवाईदरम्यान, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्यासह मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.