Source: Sakal Kolhapur
हाळवणकर आणि जाधव यांचे फोटो ….
हाळवणकर उपाध्यक्ष, जाधव प्रदेश चिटणीस
भाजप प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्यातील १५ सदस्य
कोल्हापूर, ता. ३ ः भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली. या शिवाय जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश विशेष निमंत्रित आणि निमंत्रित सदस्य म्हणून केला आहे. आज संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी यापूर्वी प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव हे गेल्या वर्षी प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. आता त्यांच्याकडे चिटणीस पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले संग्रामसिंह कुपेकर यांना विशेष निमंत्रित सदस्य केले आहे. त्यांच्याबरोबर माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके आणि ज्येष्ठ नेते बाबा देसाई हेदेखील विशेष निमंत्रित सदस्य आहेत. प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून संदीप कुंभार, सचिन तोडकर, डॉ. अजय चौगुले, संतोष चौधरी यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, विजयेंद्र माने, डॉ अरविंद माने, पृथ्वीराज यादव यांचा समावेश आहे.