Source: Sakal Kolhapur
ajr293.jpg99463
‘आजऱ्या‘वर पाणी टंचाईचे संकट‘चित्री’त ३६ टक्केच पाणीसाठा ः शेतकऱ्यांकडून पाण्याच्या नियोजनाची गरज
आजरा, ता. २९ ः वाढता उष्मा व यंदा वळीव पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट तयार झाले आहे. चित्रीचे पाचवे आवर्तन सुरु झाले आहे. त्यामुळे चित्री प्रकल्पात आता ६५४ दसलक्ष घनफुट म्हणजे ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देतांना कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढता उन्हाळा व वळीव पावसाची हुलकावणी यामुळे पाणीसाठे संपत चालले आहेत. गतवर्षी वळीवाने साथ दिली होती. मार्च, एप्रिलमध्ये सतत वळीव पाऊस झाले. शेतकऱ्यांना पिकाना पाणी देण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले नाहीत. पाण्याचीही बचत झाली. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. शेतकऱ्यांकडून होणारी पाण्याची मागणी पहाता चित्रीचे पाचवे आवर्तन सुरु झाले आहे. वेळ पडल्यास मे महीन्यात सहावे आवर्तन घेण्याची वेळ पाटबंधारे विभागावर येण्याची शक्यता आहे. गतवर्षी परतीच्या पाऊस डिंसेबर पर्यंत पडत राहील्याने फेब्रुवारी अखेरीस चित्रीच्या आवर्तनाला सुरवात झाली. यंदा मात्र एक महीना अगोदर म्हणजे जानेवारीमध्ये पहिले आवर्तन झाले. सध्या चित्री प्रकल्पात ६५४ दसलक्ष घनफुट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. एरंडोळ प्रकल्पात ६५ टक्के, धनगरमोळा १० टक्के तर खानापूर २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाला प्रकल्पात अधिक पाणीसाठा कसा राहील यासाठी धडपड करावी लागत आहे. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे सारे चित्र बदलले आहे. मे महीन्यानंतर पिण्यासाठी पाण्याबाबत अडचण येवू शकते. अनेक गावच्या पाणी योजना हिरण्यकेशी नदीवर आहेत. त्यामुळे पाण्याबाबत यंदा पाटबंधारेला अधिक काळजी घ्यावी लागत आहे. पुढील काही दिवसात उद्भभवणाऱ्या परिस्थितीवरून पावसाळ्याला सुरवात होण्यापुर्वी प्रकल्पात जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवण्यासाठी पाटबंधारे प्रयत्नशील आहे. —— प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा- चित्रीः ६५४ दसलक्ष घनफुट- एरंडोळ ः ६५ टक्के, – धनगरमोळा ः १० टक्के – खानापूर ः २४ टक्के ——–
* चित्रीच्या पाणीपातळीत घटकडक उन्हाळा, वातावरणात वाढलेले उष्मा, चित्रीमध्ये येणारा पाण्याच्या येव्यामध्ये (येणारे पाणी) कमालीची घट व पिकासाठी पाण्याचा वाढता उपसा या कारणामुळे चित्री प्रकल्पातील पाण्याची पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या पंधरा ते वीस दिवसात वळीव पाऊस झाले नाही तर चित्री प्रकल्प तळ गाठेल. अशी शक्यता वर्तवली जात आहे.