Source: Sakal Kolhapur
02675 शिरोली : औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस वाहिनीला गळती लागल्याने गॅस सोबत वातावरणात उंच उडणारे धुलीकण …
शिरोली एमआयडीसीत गॅस वाहिनीला गळती
गळती तत्काळ काढलीः दुरुस्तीचे काम सुरू असताना घडला प्रकार
नागाव,ता.२४ : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये हिंदुस्तान ऑइल गॅस पेट्रोलियम लिमिटेडची (एचओजीपीएल) गॅस वाहिनी अचानक लिकेज झाल्याने मोठी तारांबळ उडाली. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मयूर फाटा ते अल्ट्राटेक आरएमसी प्रकल्प या दरम्यान आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या फाउंड्री उद्योगाच्या युनिटला थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी एचओजीपीएल या कंपनीने शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा गॅस वाहिनी नेली आहे. मयूर फाटा ते अल्ट्राटेक प्रकल्पादरम्यान गॅस वाहिनीच्या जवळूनच जलवाहिनी आहे. या जलवाहिनीस गळती असल्यामुळे तेथे दुरुस्तीचे काम सुरू होते. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदाई करत असताना गॅस वाहिनीला धक्का लागला.यामुळे गॅस वाहिनी लिकेज झाली. गॅस मोठ्या प्रमाणात हवेत मिसळत होता. जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी खोदाई झाल्यामुळे गॅस वाहिनीतून बाहेर पडणाऱ्या गॅससोबत धुळीचे कण हवेत उंच उडत होते. शिवाय मोठ्या दाबाने गॅस बाहेर येत असल्याने विशिष्ट प्रकारचा आवाज येत होता. यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गॅस वाहिनीसाठी दिशादर्शक नंबरच्या दगडावरून संबंधित कंपनीच्या नियंत्रण कक्षाचा संपर्क नंबर मिळवला व तत्काळ कंपनीशी संपर्क साधला. दरम्यान, या मार्गावरून ये – जा करणाऱ्या प्रवाशांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत कंपनीकडून गॅस वाहिनीचा मुख्य व्हॉल्व बंद करण्यात आला होता. शिवाय तत्काळ गळती काढण्यात आले. हा नॅचरल गॅस असल्याने तो वातावरणात मिसळून धोकादायक ठरत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.