Source: Sakal Kolhapur
६ ते १४ दरम्यान शाहू मिलमध्ये कार्यक्रम
जिल्ह्यातील विविध उत्पादने, कला प्रकार, खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
कोल्हापूर, ता. ३० ः ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्वा निमित्त ६ ते १४ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम शाहू मिल येथे होतील. या कार्यक्रमातून जिल्ह्यातील विविध उत्पादने, कला प्रकार, खाद्य संस्कृती यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सर्व वयोगटातील नागरिकांना महोत्सवात सहभागी होता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘शनिवारी (ता. ६) सकाळी ९.३० वाजता शाहू समाधी स्थळावर मानवंदना देण्याचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता संपूर्ण जिल्ह्यात १०० सेकंद स्तब्ध उभे राहून राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देता येईल. त्यानंतर १०.३० वाजता शाहू मिलमध्ये सांगता व कृतज्ञता पर्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सांगता पर्वातील विविध कार्यक्रम होतील. या कालावधीत जिल्ह्यातील विविध प्रकारची वैशिष्ट्ये लोकांसमोर येतील अशा पद्धतीने सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृती लोकांसमोर येण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराजांना कलात्मक मानवंदना देण्यात येईल. विविध राज्यांतील कलाकारांकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षींना मानवंदना दिली जाणार आहे. यासाठी त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील हस्तकलेच्या वस्तू, खाद्य पदार्थ, कृषी उत्पादने यांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना विविध कलाप्रकारांचा परिचय व्हावा यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम शाहू मिलमध्ये सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत होणार आहेत. कुटुंबातील सर्वांना आनंद घेता येईल या पद्धतीने या क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.’ यावेळी पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, प्राचार्य महादेव नरके, आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील उपस्थित होते. ——
दर्जेदार चित्रपटांची पर्वणी
शाहू मिलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दर्जेदार जुने मराठी चित्रपट पाहता येणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी (ता. ६), माणूस (ता. ७), ध्यासपर्व (ता. ८), गांधी (ता. ९), महात्मा फुले (ता. १०), आनंदी गोपाळ (ता. ११), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ता. १२), सिंहासन (ता. १३) आणि देवकीनंदन गोपाला (ता. १४) यांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट दुपारी २ वाजता शाहू मिल येथे दाखवले जाणार आहेत.