Source: Sakal Kolhapur
शासननियुक्त संचालकांची भरती होणार का?
कोल्हापूर ,ता. १ ः राज्यात भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात बाजार समिती संचालक मंडळात शासननियुक्त तीन प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे काहीअंशी समितीतील गैरकारभाराला आळा बसला. त्याच धर्तीवर यंदाच्या संचालक मंडळात शासन नियुक्ती संचालक भरतीचा प्रयत्न होणार का, असा प्रश्न आज ठळक चर्चेत आला.शासननियुक्त संचालक म्हणून एक वकील, एक शेतकरी प्रतिनिधी व एक लेखापरीक्षक पाठवावा लागतो. त्यानुसार २०१५ साली बाजार समिती संचालक मंडळात भाजपचे नाथाजी पाटील, ॲड. किरण पाटील, शेतकरी नेते भगवान काटे तिघे होते. त्याकाळात अन्य संचालक मंडळाकडून गैरकारभार झाला त्या विरोधात नाथाजी पाटील, ॲड. किरण पाटील, श्री काटे यांनी तक्रारी केल्या. तर ॲड. पाटील यांनी सहकार उपनिबंधक व मुंबई उच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर पाठपुरावा केला तसेच हे प्रकरण धसास लावले. त्याची दखल घेत बाजार समितीत गैरव्यवहाराची शासनाने चौकशी केली. त्यात गैरव्यवहार झाल्याचे उघडही झाले. त्यामुळे गैरव्यवहाराला कायदेशीर चाप बसवणारा सहकार कायद्याचा अभ्यास असणारा कोणीतरी संचालक मंडळात जावे, यासाठी शासन नियुक्त संचालक भरतीसाठी राज्य शासनाकडे भाजप शिवसेना नेते प्रयत्न करतील का, याची उत्सुकता आहे. ज्या संचालकांच्या काळात गैरव्यवहाराचा झाल्याचा ठपका होता, त्यातील दोन उमेदवार निवडून आले. तर ज्यांनी गैरकारभाराला वाचा फोडली, कायदेशीर पाठपुरावा केला, ते उमेदवार मात्र यंदा निवडणुकीत पराभूत झाले.