Source: Lokmat Maharashtra
सांगली : बैलगाडी शर्यतींना परवानगीमुळे बैलांचे बाजार पुन्हा उसळी घेणार आहेत. राज्यभरातील अनेक मोठमोठ्या मैदानांसाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील खोंडांना मागणी आहे. काटकपणा, निरोगीपणा आणि चपळतेमुळे येथील खिलार खोंडांनी मुंबई, पुण्यापर्यंतच्या शर्यती गाजवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या किंमतीही २५ लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत कोरोनामुळे जनावरांचे आठवडी बाजार आणि यात्रा-जत्रातील बाजार बंद राहिले. शर्यतीही पूर्ण क्षमतेने सुरु नव्हत्या. त्यामुळे बैलांचे बाजार खुलेआम भरले नव्हते. तरीही शर्यतवानांनी व्हॉटसॲप आणि फेसबुकवरुन ऑनलाईन बाजार भरवले. बैलांची खरेदी-विक्री केली. आता शर्यती खुल्या झाल्याने बाजारही जोमात सुरु होण्याची अपेक्षा आहे. खरसुंडी (ता. आटपाडी) यात्रेत गेल्या तीन वर्षात यंदा प्रथमच खिलार खोंडांचा बाजार जोरात भरला होता. पुण्यातील शर्यत संयोजकांनी सुमारे १५ ट्रक खोंड खरेदी केले. त्यांच्या सरासरी किंमती ५० हजार ते ५ लाखांपर्यंत होत्या.
सांगली, कोल्हापुरातील बैल पुणे, मुंबईत शर्यतींसाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय कर्नाटकातील म्हैसुरी खोंडांनाही मागणी आहे. अहमदनगरच्या खोंडांचीही शर्यतीच्या बाजारात चलती आहे. काटकपणा आणि दमदार धावण्यासाठी सांगलीच्या दुष्काळी भागातील खोंड भाव खाऊन जातात. जन्मापासूनच उघड्या माळरानावर हुंदडण्याची सवय असलेल्या या खोंडांचे खूर दणकट असतात, शर्यतीनंतर सुजत नाहीत. त्यांना धापही कमी भरते. सलगरे, कोंगनोळी, कुकटोळी, कवठेमहांकाळ या भागातील खोंड दर्जेदार मानले जातात.
अनेक मैदानांचे बाजीगर
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील खोंडांच्या अनेक जोड्या शर्यतीच्या मैदानात प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरच्या संदीप पाटील यांचा हरण्या, बेडगच्या विष्णू पाटील यांचा चितंग्या, शरद पाटील यांचा चित्र्या, शिरुरच्या बाळू हजारे यांचे छब्या, चिमण्या, हणम्या हे बैल सध्या मैदानांचे बाजीगर म्हणून मिरवत आहेत.
किंमती २५ लाखांपर्यंत
शर्यतीच्या बैलांच्या किंमती सरासरी १० ते २५ लाखांपर्यंत आहेत. पाच वर्षे वयाचा बैल २० लाखांचा भाव घेतो. एवढी ऐपत नसलेला शेतकरी लाख-दीड लाखात खोंड घेतो आणि शर्यतीसाठी तयार करतो. हरिपूरच्या महेश बोंद्रे यांचा बैल सध्या २१ लाखांच्या घरात आहे.