Source: Sakal Kolhapur
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘व्हायरस ॲटक’
‘व्हायरस ॲटक’ झाल्याने बुधवारी सायंकाळनंतर सुमारे तीन तास शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळ (वेबसाईट) बंद राहिले. तांत्रिक अडचण दूर करून संकेतस्थळ पूर्ववत सुरू करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विद्यापीठाच्या संगणक आणि तांत्रिक विभागातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. अभ्यासक्रम, परीक्षांचे वेळापत्रक, विविध शैक्षणिक योजना आदींबाबतची माहिती एका क्लिकवर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. पेपरलेस कामकाज करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने विविध स्वरूपातील अर्ज, शुल्क भरणे अशा काही सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या संकेतस्थळाचा उपयोग होता. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संकेतस्थळावरील इंडेक्स टॅबवर व्हायरस ॲटक झाल्याचे संगणक-तांत्रिक विभागाच्या लक्षात आले. त्यावर या विभागाने तातडीने प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तांत्रिक प्रक्रियेतील स्कॅनिंगची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, गुरूवारपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हॉलतिकीट, वेळापत्रक, आदींची खात्री करून घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी तांत्रिक अडचण आली.