Source: Sakal Kolhapur
28384
विठ्ठल चोपडे समर्थकांसह अजित पवार गटात दाखलइचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड ः कार्याध्यक्षपदी अमित गाताडे इचलकरंजी, ता. ५ ः राज्यपातळीवर एकसंध राहिलेली शहर राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे समर्थकांसह आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटात दाखल झाले. त्यानंतर चोपडे यांची इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्षपदी व अमित गाताडे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रवेश केला. मदन कारंडे गटाचे कट्टर समर्थक अशी चोपडे यांची ओळख आहे. कारंडे यांनी शरद पवार गटाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. या घडामोडीत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहिला होता. पण चोपडे यांनी समर्थकांसह आज शरद पवार गटाशी काडीमोड घेत अजित पवार गटाला पाठिंबा देत शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला शहरात मोठे बळ मिळाले आहे. चोपडे यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी चव्हाण, माजी नगरसेवक दत्ता देडे, श्रीकांत कांबळे, आबा निऊंगरे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, सुभाष मालपाणी, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थीत होते.