Source: Sakal Kolhapur
04989
लोककलाकारांचे आर्थिकमहामंडळ स्थापन करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. २५ ः राज्यातील लोककलाकारांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करावे, ज्येष्ठ मानधन मंजुरी कोटा पाचशे करावा आदी विषयावर आज राज्य सांस्कृतिक धोरण लोककला उपसमिती आणि लोककलाकारांच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्ह्यातील लोककलाकारांनी विविध मागण्यांचे निवेदन समितीला दिले. उपसमिती सदस्य जगन्नाथ हिलीम, डॉ. दौलत कांबळे, प्रा. माणिक पट्टेबहादूर यांचा समावेश होता. जिल्हा लोककलाकार संघाचे अध्यक्ष विलास पाटील, शाहीर शामराव खडके, अनिल मोरे, मंगला गुरव, तमाशा कलावंत शंकर ढवळे, समाधान कांबळे आदी उपस्थित होते. लोककलाकारांची उत्पन्नाची अट एक लाख करावी, वृद्ध कलावंतांना चाचणी घेऊन मानधन मंजूर करावे, पूर्ववत विविध कला महोत्सव महाराष्ट्रभर सुरू करावे, शाळा कॉलेजमध्ये संगीत शिक्षक भरावे, शासनाचे उपक्रम प्रसिद्धी माध्यमांना दिले जातात ते लोककलाकारांना मिळावे, भेदिक शाहिरांना पॅकेज मंजूर करावे, वृद्ध कलावंतांच्या मानधन समितीवर लोककलाकार असावेत आदी मागण्या यावेळी झाल्या.