Source: Sakal Kolhapur
00778निमशिरगाव : येथे स्मारकाचा प्रारंभ बसवलिंग पट्टदेवरू, संजय मंडलिक, धैर्यशील माने, राजेंद्र पाटील यड्रावकर आदींच्या उपस्थितीत झाला.———–रत्नाप्पाण्णांचे स्मारक विकासाचे केंद्र होईल बसवलिंग पट्टदेवरू; निमशिरगाव येथे स्मारक, संविधान संकुलाचे भूमिपूजनदानोळी, ता. ३ ः देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्वराज्य आणि स्वराज्यासाठी आपले आयुष्य वेचले. सामान्य माणूस हा त्यांच्या विचारकार्याच्या केंद्रस्थानी होता. त्यांचे स्मारक स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली वारसा, संविधान साक्षरता, लोकशाही मूल्यांचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र होईल. त्यासाठी सर्वांनी सहाय्य करावे’, असे आवाहन बिदर येथील भालकी मठाचे परमपूज्य बसवलिंग पट्टदेवरू यांनी केले. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जन्मगावी निमशिरगाव येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारक आणि संविधान संकुलाचे भूमिपूजन बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रजनीताई मगदूम होत्या. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, अशोक स्वामी आदींनी स्मारकासाठी हवा तेवढा सर्व निधी शासनाकडून निश्चित उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.खासदार संजय मंडलिक यांनी हे स्मारक पूर्ण करण्याचे शासनाचे कर्तव्य आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा भावना व्यक्त केल्या. खासदार धैर्यशील माने यांनी रत्नाप्पाण्णांचे कार्यकर्तृत्व, दातृत्व, त्यांच्यावरील सामान्य माणसाचे प्रेम, त्यांचा पत्रव्यवहार अशा पैलूंवर प्रकाश टाकला. माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यांनी अण्णांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेत स्मारकाच्या उभारणीच्या या कार्यात मागे रहाणार नाही, असे अभिवचन दिले. माजी मंत्री आमदार विनय कोरे यांनी पाच कोटी रुपये स्मारकासाठी उपलब्ध करून देण्याचे घोषित केले.रजनीताई मगदूम यांनी आजपर्यंत शासनाकडून स्मारक उभारणीसाठी झालेल्या उपेक्षेबद्दल खंत व्यक्त केली. राजवर्धन निंबाळकर, विजय भोजे, नीता माने, रमेश चौगुले, पद्माकर पाटील, भोला कागले, बाबगोंडा पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण शिंदे आणि सुनील स्वामी यांनी केले. स्वस्तिक पाटील यांनी आभार मानले.