Source: Sakal Kolhapur
हसन मुश्रीफ यांना २० जूनपर्यंत दिलासामुंबई, ता. २ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा कायम ठेवत २० जूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश आज ईडीला दिले. मनी लाँड्रिंग प्रकरणी मुश्रीफांसह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुरू असलेल्या तपासात २० जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीने आरोप केला आहे की सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला दोन कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये दिले गेले. हसन मुश्रीफ यांची मुले नविद, आबिद आणि साजिद हे साखर कारखान्याचे संचालक किंवा भागधारक आहेत. याप्रकरणी गैरव्यवहार केल्याचा आरोप मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होते. दरम्यान, ईडीने चौकशीपूर्वी मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर छापा टाकला होता.