Source: Sakal Kolhapur
कोल्हापूर बाजार समिती क्रमांक एकची बनवू आमदार हसन मुश्रीफ
कोल्हापूर, ता. ३० ः गेल्या काही वर्षांतील बाजार समितीचा कारभार चांगला झाला नाही. त्यामुळे आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. आता पुन्हा आम्हाला संधी दिली आहे. त्यामुळे बाजार समिती शेतकऱ्यांना सर्व सोयी देऊन कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती देशातील एक नंबरची बाजार समिती बनवू’, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बाजार समितीत विजय मिळाल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, अर्जुन आबिटकर, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, मानसिंगराव गायकवाड यांच्यासह छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेलच्यावतीने सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘बाजार समितीत पाच दिवस प्रचारासाठी मिळाले. या पाच दिवसांत साडेसहा तालुक्यांतील दहा ते बारा हजार मतदारांना भेटलो. २५ वर्षे बाजार समिती आमच्या ताब्यात आहे. आता या सर्व नेत्यांनी आणि कारभाऱ्यांनी बाजार समितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. बाजार समितीत कोल्ड स्टोअरेज केले जाणार होते. मात्र, महानगरपालिकेच्या ताब्यात ही जमीन होती. भविष्यात महानगरपालिकेला विश्वासात घेऊन कोल्ड स्टोअरेज उभारले जाईल. शाहू सांस्कृतिक हॉल आहे, त्याचे नूतनीकरण केले जाईल. बाजार समितीसाठी पेट्रोलपंप, इलेक्ट्रिक मोटार वाहन चॉर्चिंग सेंटर केले जाईल. सध्या गुळापेक्षा कांदा-बटाट्याचे मार्केट जास्त आहे. अचूक काटा, अचूक वजन आणि संध्याकाळपर्यंत आलेल्या मालाची बिले दिली जात आहेत. लक्ष्मीपुरी येथील बाजार हलवून बाजार समितीत आणला जाईल. यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सुकाणू समिती नेमू. शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकर दिले जाईल. खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी शासनाकडून निधी आणावा. बाजार समितीकडे १६ ते १७ कोटींच्या ठेवी आहेत. सेस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल.’…..
पी. एन. पाटील, विनय कोरेंची सामंजस्याची भूमिका
बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्यास अडचण होती. आमदार पी. एन. पाटील आणि विनय कोरे यांच्या मतदारसंघात जास्त मतदान असतानाही त्यांनी दोन-दोन जागांवर समाधान मानले. दोघांनी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणूनच ही आघाडी झाली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले….
बाजार समितीत पक्ष नसतो
‘बाजार समितीत पक्ष नसतो. सर्वच लोकांचे समाधान होत नाही. जागा कमी आहेत आणि इच्छुक जास्त आहेत. त्यामुळे एकविचारी लोक एकत्र आले आहेत. त्यांनी पॅनेल केले आहेत. जिल्हा बँकेतही बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर विरोधातच होते आणि बाजार समितीतही ते विरोधीच राहिले आहेत’, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. ….
शिंदे गट म्हणूनच बाजार समितीत
‘विजय देवणे काय म्हणतात हे मला माहिती नाही. मात्र, बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी आम्ही शिंदे गट म्हणूनच उतरलो आहोत’, असे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.
…..कोट
‘कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. बाजार समितीत चांगल्या सुविधा देण्यासंदर्भात नियोजन केले जाईल. नूतन संचालकही याकडे गांभीर्याने लक्ष देतील.
सतेज पाटील, आमदार…..
‘बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पॅनेल रचनेला आणि प्रचाराला आणखी थोडा वेळ मिळाला असता, तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते. आमचे उमेदवार नवखे असूनही चांगले मतदान घेतले आहे. ग्रामपंचायत गटात आम्ही सत्ताधारी नेत्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगले मतदान घेतले आहे. आम्हाला एक जागा मिळाली असली तरी सभासदांना न्याय देण्याच्या बाजूने आम्ही सहकार्य करू. इथून पुढच्या काळात प्रस्थापितांकडून जर कोणी आम्हाला, तसेच मतदारांना गृहीत धरून राजकारण करणार असतील तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देऊ.समरजितसिंह घाटगे, भाजप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष…..
‘निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी मी स्वत:, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे यांनी पॅनेल तयार केले. यामध्ये व्यापारी गटात नंदकुमार वळंजू विजयी झाले. दुसरे उमेदवार अमर क्षीरसागर अवघ्या पाच मतांनी पराभूत झाले. या निवडणुकीत विरोधकांनी सुरुवातीपासूनच चुकीची भूमिका घेतली. २९२ मतदार चुकीच्या पद्धतीने मतदार यादीत घालण्याचा प्रकार केला. ते कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो. वळंजू यांचा अर्ज छाननीत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय देण्याचा अजेंडा राहील. राजेश क्षीरसागर, माजी आमदार…..