Source: Pudhari Kolhapur
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. अपर्णा पाटील यांचे ‘कावेरी’ या कादंबरीचे प्रकाशन दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान ‘आयुष्यात संकटे आली तर डगमगून न जाता संयम व जिद्द यांच्या जोरावर आपणाला मात करता येते. भोवताचे सर्व कितीही निराशादायी असला तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला यशाचे शिखरापर्यंत जाता येते, असा सूर मान्यवरांचा होता. रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. उषा थोरात, डॉ. मिलिंद पटवर्धन यांची उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तर भाग्यश्री प्रकाशन संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. उषा थोरात म्हणाल्या, ‘डॉ. अपर्णा पाटील यांनी लेखन, ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी काम केले आहे. वाचनाबरोबरच ग्रामीण भागातील मुलींसाठी इंग्रजी स्पीकिंग, स्पर्धा परीक्षा किंवा एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक उपक्रमांवर त्यांनी भर दिला आहे.
डॉ. मिलिंद पटवर्धन म्हणाले की, माणसाला जगण्याचे उद्दिष्ट सापडायला वेळ लागतो. परंतु एकदा समजले की त्यासाठी झपाटून कामाला लागता येते. ज्याचा व्यवसाय, व्यासंग आणि व्यसन एकच असते, त्याचे जगणे अधिक आनंददायी होते.
यावेळी ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला. यावेळी डॉ. वर्षा पटवर्धन, भाग्यश्री प्रकाशन संस्थेच्या भाग्यश्री पाटील- कासोटे उपस्थित होते.