Source: Pudhari Kolhapur
जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकीत स्वाभिमानी महाविकास आघाडी किंवा भाजपच्या नादाला लागायचे नाही. स्वाभिमानी कुणाच्या दारात जाणार नाही. तसेच महाविकास आघाडी किंवा भाजपने उमेदवार दिला नाही तर आम्हाला वावडे नाही. आतापासूनच कामाला लागा. गेल्या पराभवाचा बदला पूर्ण करायचा आहे, याला तुमची साथ हवी, असे आवाहन स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डन येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी शेट्टी बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून स्वाभिमानी सर्वसामान्यांच्या हितासाठी झटत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण केलेल्या कार्याची माहिती सर्वांना सांगायची आहे. 2009 ला ज्याप्रमाणे कार्यकर्ते सक्रिय होते, त्याचप्रमाणे आता आपण सक्रिय होण्याची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीला आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.
स्वागत व प्रास्ताविक शैलेश आडके यांनी केले. सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, वैभव कांबळे, गौरव इक्के यांची भाषणे झाली. सचिन शिंदे, राम शिंदे, राजगोंडा पाटील, महावीर पाटील उपस्थित होते.