Source: Sakal Kolhapur
मराठा क्रांती मोर्चातर्फे ६ मे पासून मराठा आरक्षण वनवास यात्रा
कोल्हापूर, ता. २ : मराठा क्रांती मोर्चातर्फे सहा मे रोजी मराठा आरक्षण वनवास यात्रा सुरू होत आहे. ही यात्रा सहा जूनला मंत्रालयावर धडक देणार असून, त्यात राज्यातील लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती समन्वयक हनुमंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाला संविधानिक आरक्षण ओबीसीमधूनच मिळावे, ही मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.श्री. पाटील म्हणाले,‘तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने २०१४ ला मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले. ते न्यायालयात टिकले नाही. भाजप- शिवसेना सरकारनेही एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात टिकले. मात्र सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. दोन्ही सरकारांनी न टिकणारे आरक्षण केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी दिले होते. या आरक्षणामुळे मराठा समाजाचा कोणताही फायदा झाला नाही. तरुणांना आर्थिक व शैक्षणिक संस्थांत नुकसान सहन करावे लागले.ते म्हणाले,‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात शेती करणाऱ्या कुणबी, मराठा समाजाला आरक्षण दिले होते. अनेक पुराव्यात मराठा समाज हा शेती करणारा समाज असल्याने मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी यात्रा काढणार आहोत. सहा जूनला मुंबईतील आझाद मैदानावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार असून, जोपर्यंत सरकार मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचे परिपत्रक काढणार नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.’ पत्रकार परिषदेस चंद्रकांत पाटील, पुंडलिक बिरंजे, नितीन इंगवले, प्रवीण खोपकर, मानसिंग देसाई, सिद्धोजी माने, विनायक पवार उपस्थित होते.