Source: Sakal Kolhapur
00283
महापालिकेच्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न रोखाकृती समितीची मागणी; आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची मागणी
कोल्हापूर, ता. ३ ः काही लोक गैरसमजातून महापालिकेच्या शिक्षण समितीच्या काही शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तो रोखण्याबरोबरच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, शैक्षणिक पर्यवेक्षक, समग्र शिक्षा अभियान या प्रश्नांबाबत प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन केले जाईल, अशा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने महापालिकेला दिला.उपायुक्त शिल्पा दरेकर व प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्यासोबत समितीच्या झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात यादवनगर झोपडपट्टीतील शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन दोन वर्षे झाली. आता शाळा धोकादायक असल्याने तातडीने खाली करण्याचा कारभार सुरू आहे. आता गडबडीत इमारत खाली करण्याची कार्यवाहीचे गौडबंगाल समजत नाही. या इमारतीची डागडुजी महापालिकेने त्वरित स्वखर्चाने करून घ्यावी. महापालिकेकडे दुरुस्तीसाठी पैसे नसतील तर समाजापुढे झोळी घेऊन फिरून निधी उभा करतो असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. जरगनगर विद्यामंदिरात दहावीपर्यंतचे शिक्षण मिळावे म्हणून राजमाता जिजामाता हायस्कूल जोडले. पण, काही स्थानिक विघ्नसंतोषी आणि काही शिक्षकांनी हायस्कूलविरोधी अपप्रचार करून मुलांना चुकीची माहिती दिली जात आहे. हायस्कूल कोणी बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याविरोधी रस्त्यावर उतरावे लागेल असेही सुनावले.आदर्श शिक्षक पुरस्कार ४ वर्षे दिलेला नाही. जाहीर केलेले आदर्श शिक्षक पुरस्कार ६ मे पूर्वी शिक्षकांना द्यावेत. अन्यथा ६ मे रोजी अभिनव पद्धतीने या पुरस्काराचे वितरण महापालिकेत करू. पाच वर्षे शैक्षणिक पर्यवेक्षकपद कोणाच्या हट्टासाठी रिक्त ठेवले आहे. ते त्वरित भरावे. प्रतिवर्षाप्रमाणे ६ मे पूर्वी बदली प्रक्रिया राबवावी. समग्र शिक्षा अभियानात ठोक मानधनावर कर्मचारी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या कामाची जाहीर माहिती द्यावी. शिष्टमंडळात विनोद डुणुंग, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रसाद बुलबुले, सी. एम. गायकवाड, लहुजी शिंदे, पप्पू सुर्वे, सुरेश कदम, महादेव जाधव, रणजित पोवार, अशोक पोवार, रमेश मोरे उपस्थित होते.