Source: Sakal Kolhapur
0141…भालकर्स फाउंडेशनचा पुरस्कार ऊर्जा देणारा
नृत्यदिग्दर्शिका बबिता काकडेः कलाक्षेत्रात दीर्घकाळ योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान कोल्हापूर, ता. २ ः ‘दिवंगत यशवंत भालकर हे कलावंतांना प्रोत्साहन देणारे दिलदार मनाचे दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक कलावंतांचे कलागुण हेरून त्यांना कला क्षेत्रात संधी दिली. त्या कलावंतांचा प्रवास यशाच्या दिशेने झाला. त्याच भालकरांच्या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार आम्हाला ऊर्जा देणारा आहे,’ असा भाव ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका बबिता काकडे यांनी व्यक्त केला. कलाक्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिलेल्या कलावंत व संस्थांना चित्रपट दिग्दर्शक कै. यशवंत भालकर्स फाउंडेशनतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण आज न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष निर्मलकुमार लोहिया यांच्या हस्ते झाले. दिवंगत दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे चिरंजीव संग्राम भालकर व संदीप भालकर, कन्या सपना जाधव- भालकर यांच्या वतीने फाउंडेशन चालवले जाते. तसेच नृत्य प्रशिक्षणही दिले जाते. त्याच संस्थेने कला क्षेत्रात दीर्घ योगदान देणाऱ्या कलावंतांना विविध पुरस्कार देण्यात आले. यात कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती कला सेवा पुरस्कार चित्रकार विजय बकरे, मास्टरजी सुबल सरकार स्मृती नृत्य सेवा पुरस्कार बबिता काकडे, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर स्मृती चित्र सेवा पुरस्कार इम्प्तियाज बारगीर, संगीतकार यशवंत देव स्मृती संगीत सेवा पुरस्कार ज्येष्ठ वादक संजय साळोखे व कै. मदनमोहन लोहिया स्मृती नाट्य सेवा पुरस्कार सगुण नाट्य संस्थेला श्री लोहिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी श्रीमती रेखा भालकर, चंदन मिरजकर, निर्माते विजय शिंदे प्रमुख उपस्थित होते. …
यांचाही सन्मान … डॉ. संदीप इंचनाळकर व लेखक दिग्दर्शक अविनाश देशमुख यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. प्रवीण सुतार, स्वराली तोडकर, विजय कांबळे, शिवम गेंजगे, वैष्णवी साळोखे यांना भालकर्स अभिमान पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर मराठी लोकगीत, चित्रपट गीतांवर नृत्याविष्कार सादर झाले.