Source: Lokmat National
Rishi Sunak in G-20 Summit – Pm Modi hug Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारत मंडपम येथे G-20 मध्ये उपस्थित असलेले सर्व देशांचे प्रमुख आणि पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्रिटीश पंतप्रधान आणि ‘भारताचे जावई’ ऋषी सुनक यांचे मनापासून स्वागत केले. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान शुक्रवारी दिल्लीत पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या देखील आल्या. मोदी यांनी आज ऋषी सुनक यांना हस्तांदोलन करत त्यांना आज अभिवादन केले आणि मिठी मारली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षण चर्चा झाली.
‘जय सियाराम’च्या जयघोषात सुनक यांचे विमानतळावर स्वागत
पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी ‘जय सियाराम’च्या घोषणा देत विमानतळावर त्यांचे स्वागत केले. चौबे यांनी सुनक यांना सांगितले की ते धार्मिक महत्त्व असलेल्या बक्सर या प्राचीन शहराचे खासदार आहेत आणि ज्या ठिकाणी प्रभू राम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांनी महर्षी विश्वामित्र यांची भेट घेतली होती असे मानले जाते आणि विश्वामित्र यांच्याकडून दीक्षा घेतली होती, असे मंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, मंत्री यांनी सुनक यांना रुद्राक्ष, भगवद्गीता आणि हनुमान चालीसा भेट दिली.
सुनक ‘भारताचे जावई’
ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान, सुनक यांनी अनेकदा आपल्या हिंदू मुळांचा उल्लेख केला आहे आणि त्यांना याचा अभिमान असल्याचे सांगितले आहे. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ही इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. ती नारायण मूर्ती यांची कन्या. या कारणास्तव सुनक यांना भारतीय जावई असेही म्हणतात. “मी कुठेतरी पाहिले आहे की मला भारताचा जावई म्हणतात. मला आशा आहे की ते प्रेमाने म्हटले जाते,” असे सुनक यावर बोलताना म्हणाले.