Source: Lokmat National
नवी दिल्ली : G20 परिषदेच्या निमित्ताने भारतात जवळपास अर्धे जग एकवटले होते. अनेक देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्लीमध्ये आले आहेत. यातच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुद्धा आले आहे. दरम्यान, आज (रविवारी) सकाळी ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्तीसोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी स्वामी नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ऋषी सुनक यांच्या भेटीपूर्वी स्वामी नारायण मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला . डीसीपी आणि ज्वाईंट सीपींकडून येथील मंदिर परिसरात मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. ऋषी सुनक आज सकाळी पाऊस सुरू असताना पत्नी अक्षता मूर्तीसोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी सर्व विधींसह भगवान स्वामी नारायणाचे दर्शन घेतले.
दरम्यान, राजधानी दिल्ली येथे शनिवारपासून सुरू झालेल्या G20 परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक शुक्रवारी भारतात दाखल झाले. पत्नी अक्षता मूर्तीसह ऋषी सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे व भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी स्वागत केले. येथील विमानतळावर ऋषी सुनक यांच्या स्वागतासाठी आयोजित पारंपरिक नृत्याला ब्रिटनच्या पाहुण्यांनी दाद दिली. तर, चौबे यांनी जय सियाराम म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सुनक यांनी मी हिंदू असल्याचा आणि भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान असल्याचेही म्हटले होते.
जी -20 परिषदेचा दुसरा दिवसनवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी आज 9 देशांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.