Source: Sakal Kolhapur
शिंदे गटाबरोबर युती अशक्य
ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे पत्रक
कोल्हापूर, ता. २१ ः राजकारणामध्ये युती, आघाडी नेहमीच होत असतात. मात्र, सत्तेसाठी दलबदलूपणा हा दुर्देवी आहेच तो ही राजकारणाचा भाग आहे. पण, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीशी खंजीर खुपसून भाजपशी युती करणाऱ्या शिंदे गटाबरोबर कुठल्याही निवडणुकीमध्ये युती अशक्य असल्याचे पत्रक ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिध्दीस दिले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये तयार केलेले आणि शिंदे गटाच्या मदतीने झालेली आघाडी मान्य नाही. महाविकास आघाडीने कोणतीही आघाडी करताना राज्यातली युती लक्षात घेता शिवसेनेला सन्मानाने वागणूक सातत्याने ठेवावी. कोल्हापुरातील सर्वच मतदारसंघांमध्ये निकाल पालटवण्याची शिवसेनेकडे क्षमता आहे. शिंदे गटाला प्रत्येक ठिकाणी चितपट करून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून नामोहरण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे….आघाडीशी संबंध नाहीदरम्यान,शिव शाहू परिवर्तन आघाडीकडून माझी उमेदवारी जाहीर झाली होती. पण, या आघाडीत शिंदे गट सहभागी असल्याने या निवडणुकीतून माघार घेत आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनानुसारच पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे पत्रक सातार्डेचे सुरेश पोवार यांनी प्रसिध्दीस दिले आहे…….
शिव- शाहू परिवर्तन आघाडी पक्षविरहितच
शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांचे पत्रक
कोल्हापूर, ता. २१ ः वैयक्तिक स्वार्थासाठी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी गद्दारी करणाऱ्या संजय पवारांना कोणीही किंमत देत नाही. शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची स्थापना पक्षविरहीत आणि शेतकरी हिताच्या कामासाठी झाली आहे. पवार यांना काल दिवसभरात या पक्षविरहित आघाडीला विरोध का केला नाही, अशा आशयाचे पत्रक शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यामुळे संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नाहीत. त्यांच्या तोंडी गद्दारी हा शब्द शोभत नाही. विधानसभेच्या प्रत्त्येक निवडणुकीत त्यांनी शिवसेना उमेदवार आणि धनुष्यबाणाविरोधात काम केले आहे. बाजार समितीसाठी आघाडीमध्ये सामील सर्वच नेते पक्षविरहीत आणि शेतकरीहिताच्या कामासाठी आणि कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीने केलेल्या आघाडीमध्ये संजय पवारांना विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना राजकारणातून नामोहरण करण्यापेक्षा स्वत:चे अस्तित्व टिकवण्याची खबरदारी घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
_____________________________________