Source: Sakal Kolhapur
प्रशासक आज जाणून घेणारटीपीबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी
कोल्हापूर, ता.५ ः नगररचना विभागाबाबत (टीपी) सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्याबरोबरच त्या स्वीकारण्यासाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी उद्या (ता.६) स्वतः नगररचना विभागात दुपारपर्यंत थांबणार आहेत.गेल्या आठवड्यात ‘सकाळ’ने या विभागाबाबतची मालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अनेक नागरिकांना येत असलेल्या तक्रारी मांडण्यास सुरूवात केली होती. प्रशासक गेल्या आठवड्यात रजेवर होत्या. त्यामुळे सोमवारी रूजू झाल्यानंतर या विभागातील तक्रारी जाणून घेण्याबरोबरच त्या स्वीकारण्यासाठी मंगळवारी दुपारपर्यंत अधिकाऱ्यांसमवेत थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अनेक नागरिक सातत्याने हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही कार्यालयात जाऊन तक्रारी ऐकून त्यांची निर्गत करण्याचा प्रयत्न केला होता.सकाळी अकरापासून दुपारी एक या वेळेत जनता बझार येथील नगररचना कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त, सहायक संचालक, उपशहर रचनाकार व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित असतील. या विभागाशी निगडित तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.