Source: Sakal Kolhapur
पोषण आहाराचे बिल न दिल्याने तरूणाने घेतले पेटवून
कागल तालुक्यात घटना : शाळेसमोर मैदानातच प्रकार ; संस्थाचालक व शिक्षकांचे मौन
कसबा सांगाव, ता.२ : मागील चार महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे बिल न मिळाल्याने संतप्त होऊन तरुणाने शाळेसमोर मैदानातच स्वतःला पेटवून घेतले. ही खळबळजनक घटना कागल तालुक्याच्या पूर्व भागातील एका नामांकित शाळेत घडली. घटनेत भाजलेल्या तरूणावर प्रथम कागलमध्ये त्यानंतर कोल्हापुरात खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेनंतर संबंधित शाळेतील शिक्षकांचे धाबे दणाणले. हे प्रकरण दडपण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली करण्यात आल्या. याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी, कागल तालुक्यातील एका नामांकित शाळेतील शालेय पोषण आहाराचा ठेका एका बचत गटाच्या नावे दिला आहे. गटातील सदस्याच्या कुटुंबियातील व्यक्ती ठेकेदार म्हणून अनेक दिवसापासून पोषण आहार देण्याचे काम करते. जानेवारीपासून सुमारे एक लाख सात हजार रुपये ठेकेदाराचे बिल शिक्षण संस्थेकडे थकले आहे. वारंवार मागूनही त्या बिलाची रक्कम दिली नाही. दरम्यान, आज थकीत रकमेच्या धनादेशावर उर्वरित सह्यांसाठी संबधित तरुणाची धडपड सुरू होती. जानेवारी महिन्यातील ३८,४०९ रुपये धनादेशाने मिळाले नाहीत, त्यानंतर १५ एप्रिल २०२३, १६ मार्च आणि २६ एप्रिल या तारखेचे धनादेश शाळेने तयार केल्याची माहिती समोर आली. मात्र सह्या अपूर्ण असल्याने ही रक्कम ठेकेदाराला मिळाली नाही. दरम्यान, बिलासाठी शाळा प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागल्याने संतप्त तरूणाने आज, मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास शाळेसमोरील मैदानात स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत तो भाजून जखमी झाला.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर संबधीत शाळेतील शिक्षकांची पळापळ झाली, त्यांनी संबंधित जखमी तरूणाला त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने प्रथम कागल येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले….अंतर्गत वादातून बिले थकवलेशाळा प्रशासनातील बेबनाव आणि पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादातून पोषण आहाराचे बिले देण्यास विलंब लागल्याची चर्चा परिसरात सुरू होती. शाळा प्रशासनानेही या प्रकरणी काहीच घडले नसल्याचा कांगावा केला आहे. दरम्यान, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले. प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ही घटना घडली. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देण्यात शाळा व्यवस्थापनाने नकार दिला आहे.