Source: Sakal Kolhapur
00127
निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट—पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील गळती दुरुस्त; नऊ टॅंकरद्वारे पुरवठाकोल्हापूर, ता. २ : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील गळती दुरुस्तीसाठी काल (ता. १) बंद ठेवलेल्या पाणीपुरवठ्यामुळे आज ए, बी वॉर्डसह ई वॉर्डमधील अनेक भागांत पाण्याचा ठणठणाट होता. नऊ टॅंकरद्वारे जवळपास ४७ ठिकाणी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. काल रात्रभर काम करून गळती दुरुस्त करण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले. त्यातून दररोज वाया जात असलेले लाखो लिटर पाणी वाचविण्यात आले. दरम्यान, पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी उद्या (ता. ३) अनेक भागांत कमी दाबाने पाणी मिळणार आहे. चेंबरला लागलेली गळती दहा वर्षांपासून होती. त्यातून दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात होते. त्याच्या दुरुस्तीचे काम काल हाती घेण्यात आले. त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवले. परिणामी, पुईखडी केंद्रातून पुरवठा केला जाणारा ए, बी तसेच ई वॉर्ड भागातील पाणी बंद राहिले. आज पहाटेपर्यंत युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आजही सकाळच्या सत्रात होणारे पाणी बंद राहिले. दोन दिवस विविध भागांत टॅंकरने पाणी देण्यात आले. भाड्याने घेतलेल्या टॅंकरसह नऊ टॅंकरच्या आज ४७ फेऱ्या झाल्या.आज सायंकाळच्या सत्रात काही भागांत अपुऱ्या दाबाने पाणी मिळाले. उद्या सकाळपासून सर्वत्र पाणी मिळेल, असे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. पण, अनेक भागांत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार जल अभियंता सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी गळती काढली.
चौकटतासाला लाख लिटर गळती होणारे पाणी थांबविलेबालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर प्लॅंटमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होती. त्यामुळे चंबुखडी टाकीत पुरेसा पाणीसाठा होत नव्हता. गळतीचे ते पाणी एकत्र करून उपसा करून ते पुरवठा टाकीत सोडण्याचे काम केले. त्यामुळे तासाला एक लाख लिटर वाहून जात होते, ते परत वापरण्यात येत आहे.