Source: Sakal Kolhapur
जिल्ह्यात पावसाची दिलासादायक हजेरी
माळरानातील भात, सोयाबीन, मूग, सुर्यफूल पिकांना जीवदानसकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ८ : जिल्ह्यात पावसाने आज दिलासादायक हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाल आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील भात, भुईमूग, उसासह इतर पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थिती जोरदार पावसाची आणि पाण्याची गरज आहे. याशिवाय, उन्हाचा तडाखाही जोरदार वाढला होता. कालपासून पाऊस होईल, अशी अपेक्षा वाढू लागली आहे. जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी तालुक्यात चांगला पाऊस झाला. तर करवीर, कागल, हातकणंगले तालुक्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे माना टाकलेल्या पिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. माळरानातील भात, सोयाबीन, मूग, सुर्यफूल, भुइमूगासह इतर पिकांना मोठा पाऊस होईपर्यंत तग धरु शकतील असे चित्र आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात पाण्याअभावी पिकांना उभारी मिळत नाही. आजही पावसाचे प्रमाण कमी असल्याने वीजपंपाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. राधानगरी तालुक्यात पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. …धामोड परिसरात दिवसभर रिपरिप
धामोड : येथे सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना दिलासा मिळाला. परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे माळरानावरील वाया जाणाऱ्या भात पिकांना या पावसाने जीवदान मिळाले. …बळीराजा सुखावलाराशिवडे बुद्रुक : प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. पोटरीत आलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले असून नुकसान कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरा दिवसात त्याने चक्क उघडीप दिल्याने पोटरीला आलेल्या पिकांना झटका बसला. ऐन गरजेच्या वेळीच मुळांना पाणी नसल्याने भात व अन्य पिके बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली.प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मध्यरात्रीपासून पावसाने दमदार सुरुवात केली…..गगनबावडा तालुक्यात दमदार हजेरी
गगनबावडा : गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गगनबावडा तालुक्यात दमदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कुंभी धरणक्षेत्रात ५५ मिलिमीटर तर कोदे धरणक्षेत्रात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुंभी मध्यम प्रकल्प क्षमतेच्या ९८.५३ टक्के भरला आहे. …पिकांना जीवदानपोर्ले तर्फ ठाणेः प्रदीर्घ विश्रांतीनंतर आसुर्ले -पोर्ले परीसरात सकाळपासून दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.