Source: Sakal Kolhapur
‘राधानगरी’ प्राधिकरण स्थापनेची अधिसूचना जारी
राधानगरी ता. २४ : राधानगरीच्या भविष्यात घडू शकणाऱ्या पर्यटन विकासाच्या मोठ्या बदलाचा प्रारंभ अभयारण्य आणि धरण क्षेत्रातील गावांच्या पर्यटन विकासासाठी स्थापन झालेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाने झाला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकासासाठी प्राधिकरण स्थापनेची अधिसूचना जारी झाली आहे.
आगामी काळात पर्यटन विकास आणि पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा या दोन्हीवर अत्यंत सकारात्मक परिणाम प्राधिकरण स्थापनेमुळे होणार आहेत. आमदार आबिटकर यांनी गेल्या दोन-तीन वर्षापासून राधानगरी-दाजीपूरच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या आठवड्यातच पर्यटन विकासासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी विशेष दखल घेऊन तात्काळ प्राधिकरण स्थापनेचा निर्णय घेतला. राज्याच्या नगरविकास विभागाने ही जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविली आहे. पर्यटन विकासाचा सर्व समावेशक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. पुणे विभागाच्या नगररचना संचालकांच्या अहवालानुसार हे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. यापूर्वी राधानगरी दाजीपूर अभयारण्य,राधानगरी धरण क्षेत्र पर्यटन विकासाचे आराखडे तयार झाले. मात्र तांत्रिक आणि आर्थिक बाबींच्या अडसरामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी लांबणीवरच पडत गेली आहे. आता विशेष प्राधिकरण स्थापनेमुळे तांत्रिक व आर्थिक बाबींचे अडसरांवर मात होणार आहे.
….
पहिल्या टप्प्यात आवश्यक सर्वेक्षण‘प्राधिकरणाच्या माध्यमातून अभयारण्य व धरणाक्षेत्रातील ८४ गावांच्या पर्यटन विकासाचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आवश्यक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पर्यटन विकास नियोजन प्रस्ताव करताना वन्यजीव वृक्षसंपदा संवर्धन व संरक्षण या दृष्टीने अभ्यास करण्याची ही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
….
‘राधानगरी- दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठा वाव आहे.प्राधिकरण स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्याने, आगामी काळात राधानगरी तालुका ”टुरिझम हब”बनणार आहे. प्रकाश आबिटकर, आमदार