Source: Sakal Kolhapur
घरे नियमित करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार-सांगरूळमध्ये अतिक्रमणधारक आक्रमक;
सांगरूळ, ता. ४ ः करवीर तहसीलदारांनी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे सांगरूळमधील सुमारे ५०० कुटुंबे उद्ध्वस्त होणार असून, शासनाने कारवाई मागे घेऊन घरे नियमित करून द्यावीत, अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सांगरूळमध्ये ग्रामस्थांची याबाबत आज बैठक झाली . तहसीलदारांनी सोमवारी ५१०० तालुक्यातील कुटुंबांना बजावल्या आहेत. गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, ‘जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना भेटून यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी विनंती करूया. सर्व सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढूया.’ वेळप्रसंगी कुटुंबासमवेत शासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार माजी उपसरपंच एस. एम. नाळे यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधी लक्ष देत नसतील, तर यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदारांना भेटून निवेदन देण्याचेही ठरले. कुंभीचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर, माजी सरपंच सदाशिव खाडे , माजी उपसरपंच सुशांत नाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीनाथ खाडे, भगवान लोंढे, अरुण खाडे , बदाम खाडे, रंगराव नाळे, तानाजी वातकर, प्रशांत वातकर, भीमराव नाळे, संभाजी नाळे यांनी मनोगत व्यक्त केले.