Source: Sakal Kolhapur
01917, 01918महालक्ष्मी देवीच्या यात्रेचीनानीबाई चिखलीत लगबग
आज इरडे घालण्याचा कार्यक्रम
नानीबाई चिखली, ता. ४ ः येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा पाच दिवसांवर आलेली आहे. लोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिराच्या नूतन वास्तूत प्रथमच यात्रा भरत आहे. यात्रेनिमित्त रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आहे. संस्थान काळापासून तीन वर्षांनी महालक्ष्मी यात्रा भरते. २०२० मध्ये कोरोनामुळे यात्रा भरली नाही. २०२० ला जुलैमध्ये महापुरात मंदिराच्या इमारतीचा भाग कोसळला. त्यानंतर लोकवर्गणीतून मंदिराची भव्य वास्तू उभारली. शुक्रवारी (ता. ५) इरडे घालण्याच्या कार्यक्रमाने यात्रेचा प्रारंभ होईल. मंगळवारी (ता. ९) पहाटे पाच वाजता श्री महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी ओटी भरणे, आंबिल-घुगऱ्या व रात्री ठीक ९ वाजता महालक्ष्मी देवीची मिरवणूक व आतषबाजी होईल. बुधवारी (ता. १०) जेवणे व कार्यक्रम, रात्री नऊ वाजता मायबोली प्रस्तुत गीतराधाई सांस्कृतिक कार्यक्रम आहे. गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजता महालक्ष्मी देवीची विसर्जन मिरवणुकीने यात्रेची सांगता होईल. यात्रेची जोरात तयारी सहा वर्षांनंतर होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त घरांची डागडुजी, रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामपंचायत, यात्रा कमिटी नियोजनात गुंतली आहे. दुकाने, स्टॉलसाठी मंदिराजवळ जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे. वीज वितरणकडून अखंडित वीज पुरवठ्यासाठी नियोजन सुरू आहे.