Source: Sakal Kolhapur
04953
नव्या संसद भवनाचेउद्घाटन अन् कोल्हापूर..!—राणिंगा, मालेकर यांनी दिला आठवणींना उजाळासकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. २५ ः नवी दिल्ली येथील नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राजदंड आणि कोल्हापूर कनेक्शन याविषयीच्या आठवणींना आज मंदिर व मूर्ती अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर, उमाकांत राणिंगा यांनी उजाळा दिला. ॲड. मालेकर म्हणाले, ‘‘नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी नंदी अंकित असलेला राजदंड स्थापित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून असा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातात सुपूर्द करण्यात आला होता. तो राजदंड कित्येक वर्षे प्रयागराज येथील वस्तुसंग्रहालयात होता. आता नव्या भवनाच्या उद्घाटनावेळी हा राजदंड सभापतींच्या आसनाजवळ स्थापित करण्यात येणार असल्याचे समजते. असा राजदंड धारण करण्याची पद्धत भारतात प्राचीन काळापासून आहे. त्याचा उत्तम पुरावा कोल्हापूरच्या दक्षिणेला राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वरवाडी या गावात आहे.’’ चक्रेश्वरवाडीतील श्री चक्रेश्वर मंदिरात मिळालेल्या सूरसुंदरीच्या भग्न मूर्तीच्या हातात छातीजवळ धरलेला राजदंड आहे. बाराव्या शतकातील ही मूर्ती असल्याचे पुरावे प्राचीन शिलालेखांमधून मिळतात. त्यावरूनच कोल्हापूर भागातही सार्वभौम सत्तेची राज्यसत्ता प्रचलित होती, याचाच हा पुरावा आहे. चक्रेश्वरवाडी येथील या सूरसुंदरीच्या मूर्तीचे छायाचित्र आणि तिच्या हातातील राजदंडाची छायाचित्रे आजही श्री. राणिंगा यांच्या संग्रहात आहेत, असेही ॲड. मालेकर म्हणाले.