Source: Sakal Kolhapur
ताराराणींचे राष्ट्रीय स्मारक व्हावेमहेश पाटील-बेनाडीकर; पुरातत्त्वकडे मागणीपन्हाळा, ता. ३ : करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांची समाधी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी आणि भव्य स्मारक उभारून त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी भारतीय स्वराज्य क्रांती पार्टीचे अध्यक्ष महेश पाटील बेनाडीकर यांनी पुरातत्त्व विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, गेली अनेक वर्षे आपण महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाच्या दुरवस्थाबाबत आवाज उठवत आहोत. पण अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. प्रतिकूल परिस्थितीत जाज्वल्य इतिहास निर्माण करणाऱ्या ताराराणींच्या सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील समाधिस्थळाचा वेबसाईटवरील राष्ट्रीय स्मारक संरक्षण यादीत नामोल्लेखही नाही. ताराराणींनी कठीण काळात स्वराज्य अबाधित ठेवत राष्ट्रात महिलाशक्ती विषयी अभिमान जागृत केला आहे.भारतीय महिला शक्तीची प्रेरणास्रोत असणाऱ्या ताराराणी यांचे निधन अजिंक्यतारा किल्ल्यावर १७६१ साली झाले, पण अंत्यविधी संगम माहुली येथे झाला. त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या समाधीची सध्या दुरवस्था झाली आहे. याबाबत राष्ट्रीय स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष तरुण विजय, सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी, तसेच नॅशनल मॅन्युमेंट अॅथारिटीचे अध्यक्ष किशोर कुमार वसा यांच्याशी चर्चा झाली असून पुरातत्त्व विभागाच्या प्रशासनाने त्वरित पावले उचलून या समाधीचे जतन व संवर्धन करावे.