Source: Sakal Kolhapur
तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्नदोडामार्ग तालुक्यात प्रकार; हातोडीनेही हल्ला, तरुण अटकेतसकाळ वृत्तसेवा दोडामार्ग, ता. ३ ः दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा संशयावरून प्रेयसीच्या डोक्यात हातोडीने प्रहार करून घायाळ केल्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून प्रियकराने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी संशयित मनोहर अशोक गवस (वय २४, रा. आंबडगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. जखमी युवतीवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दोडामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ः मनोहर गवस व पीडित तरुणी यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम होते; परंतु तिचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय मनोहरला होता. त्यातून तो बरेच दिवस तिच्याशी वाद घालत होता. मंगळवारी (ता. ३) दुपारी मनोहरने तिला गाठत वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद विकोपाला गेला. यातून त्याने तिच्यावर लोखंडी हातोडीने हल्ला चढविला. तिच्या डोक्यावर व हातावर हल्ला करून जखमी केले. गंभीर जखमी तरुणीला त्याने जिवंत जाळण्याच्या हेतूने पेट्रोल सदृश पदार्थ तिच्या अंगावर टाकला आणि लायटरने आग लावून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र तरुणीने घाबरून जीवाच्या आकांताने आरडाओरड केला. तो ऐकून जवळच असलेल्या काजूबागेतील लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यांना पाहून मनोहरने तेथून पळ काढला. जखमी तरुणीला ग्रामस्थांनी तत्काळ येथील रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिरावल्यावर पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्यानुसार मनोहर गवस याला पोलिसांनी अटक करून आज येथील न्यायालयात हजर केले. सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर तपास करीत आहेत.