Source: Sakal Kolhapur
03484
पाडळी खुर्दः येथे कडब्याच्या ट्रकला लागलेली आग…
पाडळी खुर्द येथे कडब्याच्या ट्रकला आग
बालिंगा, ता.३ः पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे ट्रकमधील कडब्याचा विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने ठिणग्या पडून ट्रकमधील कडब्याने पेट घेतला. आज दुपारी बारा वाजता ही घटना घडली. कडक ऊन व वाऱ्यामुळे आगीने क्षणात उग्र रूप धारण केले. आगीत ट्रकचे नुकसान झाले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाडळीतील शेतकऱ्याला वैरणीचा कडबा देण्यासाठी हा ट्रक आला होता. ट्रक नरसिंह तरुण मंडळाच्या बोर्डजवळ आला असता विद्युतवाहक तारांना ट्रकमधील कडब्याचा स्पर्श झाला. यामुळे दोन विद्युत तारांचे घर्षण होऊन ट्रकमधील कडब्यावर मोठ्या प्रमाणात ठिणग्या पडल्या व आग लागली. चालक प्रसंगावधान राखत ट्रक गावाबाहेर मोकळ्या जागेत घेऊन आला. दरम्यान, ग्रामस्थांनी व बोंद्रे नगरमधील काही तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीने भीषण रूप धारण केले होते. फुलेवाडी येथील अग्निशमन दलाला पाचारण करताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली. तरूणांनी ट्रकमधील कडबा ओढून खाली काढला. प्राथमिक माहितीनुसार तीन लाखांचे नुकसान झाले आहे….