Source: Sakal Kolhapur
99686
टिपरवर सॅनिटरी, ई वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र बॉक्स कोल्हापूर, ता. ३० ः घराघरातून कचरा संकलित केला जात असताना अनेकदा सॅनिटरी तसेच घरगुती घातक कचरा एकत्र येतो. त्यावर उपाययोजना म्हणून इंदौरच्या धर्तीवर घरगुती घातक कचरा, सॅनिटरी आणि ई वेस्ट संकलनासाठी प्रत्येक टिपरवर स्वतंत्र बॉक्स करण्यात आले आहेत. विविध रंगाद्वारे त्याचे वेगळेपण दर्शवण्यात येत आहे.याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सोमवारी (ता. १) उद्घाटन होणार आहे. घरगुती कचरा उचलण्यासाठी १६९ टिपर आहेत. कंटेनरमुक्त कोल्हापूरची संकल्पना राबवताना दोन वर्षात कंटेनर काढले आहेत. टीपरद्वारे घरगुती ओला व सुका कचरा वर्गीकरण करून संकलनासाठी प्रकल्पावर नेला जातो. यामध्ये बऱ्याच वेळा सॅनिटरी वेस्ट, घरगुती घातक कचरा एकत्र येतो. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून इंदौरच्या धर्तीवर टीपरवर घरगुती घातक कचरा, घरगुती सॅनिटरी कचरा आणि ई वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र बॉक्स केला आहे. त्यांना वेगवेगळे रंग दिले आहेत. पंधरा दिवसांत सर्वच टीपरवर व्यवस्था केली जाणार आहे कळंबा कारागृहामार्फत हे काम करण्यात येत असून, महापालिकेने स्वनिधीतून खर्च केला आहे. त्यात घरगुती घातक कचरा जसे ट्यूबलाईट, बल्ब, पेस्टिसाइड, रंगाचे डबे, बॅटरी सेल तसेच घरगुती सॅनिटरी वेस्ट जसे सॅनिटरी नॅपकिन, डायपर, मेडिसिन, ग्लोव्हज, मास्क आणि ई-वेस्ट जसे जुने कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू ,खराब मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स यांचे वर्गीकरण करून स्वतंत्र संकलन केले जाणार आहे. हा कचरा स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी केले.