Source: Sakal Kolhapur
जनसुरक्षा मोहीमेत सहभागी व्हावे
संजयसिंह चव्हाण ः३० जूनपर्यंत मोहिम राबवली जाणार
कोल्हापूर, ता.२४ : केंद्र सरकारच्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध विमा योजनांचा सर्वसामान्यांपर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनसुरक्षा मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिली. ३० जूनपर्यंत ही मोहिम राबवली जाणार असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. चव्हाण म्हणाले, ‘केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन, अग्रणी जिल्हा बँक व इतर सर्व व्यापारी बँका, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयाने ग्रामपंचायत स्तरावर ‘जनसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे. ग्रामपंचायत स्तरावर यासाठी शिबिरांचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायतींमध्ये हे शिबिर सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत सुरु राहील.’ते पुढे म्हणाले, ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी २ लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना आहे. यामध्ये १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता २० रुपये प्रती व्यक्ती प्रतीवर्षी इतका अल्प आहे. विमा धारकाचा मृत्यू झाल्यास अथवा दोन्ही डोळ्यांची संपूर्ण अथवा बरी न होणारी हानी झाल्यास किंवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये इतकी भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना आहे. यामध्ये १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रुपये इतकी भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता ४३६ रुपये इतका प्रती व्यक्ती प्रती वर्षी आहे.’