Source: Sakal Kolhapur
00022
‘चेतना’ने विशेष मुलांना स्वावलंबी बनवलेनिखिल पंडीतराव; ‘चेतना’ संस्थेच्या दर्पण नियतकालिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवाकोल्हापूर, ता. २ ः चेतना अपंगमती विकास संस्था तीन दशकांपासून माणूस घडवण्याचे काम करत आहे. त्यामुळे समाजातील ही विशेष मुले ताठ मानेने जगत आहेत. ज्याप्रमाणे हिऱ्याला पैलू पाडतात तसेच हे माणूस घडवण्याचे काम आहे, असे प्रतिपादन सकाळचे कार्यकारी संपादक निखिल पंडीतराव यांनी केले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेचा दर्पण या नियतकालिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. पंडीतराव म्हणाले, ‘समाजामध्ये सर्व प्रकारची माणसे असतात. त्यामध्ये ही विशेष मुलेही आहेत. या मुलांमध्येही अनेक गुण आहेत. त्या गुणांना शोधणे आणि त्यांना विकास करणे हे काम चेतना अपंगमती विकास संस्था करते. हे काम हिऱ्यांना पैलू पाडण्यासारखे आहे. या मुलांना सांभाळणे हे कौशल्याचे काम आहे. संस्थेतील शिक्षकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही विशेष मुले समाजात ताठ मानेने वावरत आहेत. ‘सकाळ’ने नेहमीच चेतना अपंगमती विकास संस्थेला सहकार्याची भूमिका घेतली आहे. ‘सकाळ’ पूर्वीपासून आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावत आला आहे. संस्थापक संपादक डॉ. ना. भी. उर्फ नानासाहेब परुळेकर यांच्यापासून सुरू झालेली ही समाजसेवेची परंपरा पुढे सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रताप पवार आणि आता व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी कायम ठेवली आहे. शरीरातील पाच इंद्रीयांद्वारे आपण ज्ञान घेत असतो. त्या पलिकडील ज्ञान प्रसारमाध्यमे देतात. दर्पण हे संस्थेने नियतकालीक ज्ञान देण्याचे काम करेल.’ संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे म्हणाले, ‘शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. मात्र, विशेष मुलांसाठी स्वतंत्र शासकीय विभाग सुरू केल्यास त्याचा अधिक लाभ होऊ शकेल. संस्था मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहाण्यासाठी प्रयत्न करते. पालकांनीही यासाठी घरामध्ये प्रयत्न केले पाहिजेत.’ यावेळी सुयश इरजे आणि निनाद गुरव या संस्थेतील विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुख्याध्यापक अजया पाटील, दिलीप बापट, कृष्णात चौगले, सुनिल करकरे, श्रीराम भिसे, निलेश वालावलकर हे उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. दर्पण हे नियतकालीक सुरू करण्यामागची कल्पना सांगितली. तसेच दर्पणचे पुढील अंक ऑनलाईन वाचता येतील असे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष आयुर्वेदाचार्य सुनिल पाटील यांनी कार्यकारी संपादक निखील पंडितराव यांचा परिचय करून दिला.