Source: Pudhari Kolhapur
जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : पतीला कोंडून विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना चिपरी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्लम हुसेनसाब सवनूर (वय 35, रा. चिपरी बेघर वसाहत, ता. शिरोळ) याला बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली. तो आचारी काम करतो.
जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर कर्नाटकात दहा गुन्हे दाखल आहेत. संशयित आणि पीडिता शेजारी राहतात. पीडित महिला संशयिताच्या घरात गेल्या दोन महिन्यांपासून भांडी घासण्याचे काम करते. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास संशयिताने या महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. महिलेने दार उघडले असता संशयिताने तिचा हात धरून घराबाहेर ओढले.
आवाजाने पती बाहेर आला असता त्याला घरात ढकलून संशयिताने बाहेरून कडी लावली. यानंतर त्याने महिलेचे तोंड दाबून तिला थोड्या अंतरावर असणार्या विहिरीजवळ नेऊन बलात्कार केला. घटना कोणाला सांगितली, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत तो पळून गेला. बुधवारी महिलेने जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातून त्याला अटक केली. विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.